

सागर रोकडे : सकाळ वृत्तसेवा
कवठे येमाई, ता.१७ : नाग, धामण यासारख्या मोठ्या सापांचा सध्या प्रजनन तसेच मिलनकाल सुरू आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकरी, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्ह्यातील सर्पमित्रांनी केले आहे.
सर्पमित्रांच्या माहितीनुसार, उन्हाळ्यात जमिनीवरील तापमानात मोठा बदल होत असल्याने साप गारव्याच्या तसेच भक्षाच्या शोधात बाहेर पडतात. मिलनकाळामुळे एका ठिकाणी दोन किंवा अधिक साप आढळण्याची शक्यता अधिक असते. या काळात साप अधिक चिडलेले असतात, त्यामुळे त्यांचा दंश होण्याचा धोका वाढतो.
सापांना मारण्यापेक्षा हाताळण्याची गरज
घराच्या परिसरात, शेतात आढळणारे सर्वच साप हे विषारी नसून फक्त फुरसे, घोणस, नाग, मण्यार, पोवळा हेच विषारी आहेत. मिलनकाळ सुरू असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. साप हा पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक असून, त्यांना मारण्यापेक्षा योग्य पद्धतीने हाताळण्याची गरज असल्याचे निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, नेचर गार्ड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष गणेश टिळेकर, तसेच वन्य पशुपक्षी सामाजिक संस्थेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे यांनी सांगितले.
सर्पदंशाच्या घटनांमध्ये विष शरीरात वेगाने पसरते, विशेषतः उन्हाळ्यात त्याचा परिणाम अधिक वेगाने होतो. त्यामुळे सर्पदंश झाल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जावे.
- डॉ. सौरभ ढमढेरे, वैद्यकीय अधिकारी, कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्र
अशी घ्या काळजी..
• शेतात किंवा मोकळ्या जागेत काम करताना बूट व सुरक्षित कपडे वापरावेत.
• घराच्या आसपास झुडपे, गवत, कचरा व अनावश्यक वस्तूंचा साठा टाळावा.
• साप आढळल्यास त्याच्या संपर्कात न जाता तत्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाला कळवावे.
• सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता तातडीने रुग्णालयात जावे.
• साप दिसल्यास भीतीने गोंधळून न जाता सावधानता बाळगावी.
फेब्रुवारी ते एप्रिल हा सापांचा मिलनकाल असल्याने या काळात ते जास्त सक्रिय असतात. नागरिकांनी योग्य खबरदारी घेतली नाही तर साप मानवी वस्तीत शिरण्याची शक्यता वाढते. साप आढळल्यास घाबरू न जाता सर्पमित्रांना बोलवावे. सापाला मारण्याचा प्रयत्न करू नका. साप निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. योग्य खबरदारी घेतल्यास मनुष्य आणि सापाचे सहजीवन शक्य आहे.
-निळकंठ गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर
01104, 01105, 01106, 98831
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.