अकरावीचे प्रवेश ऑफलाईनच घेण्याची मागणी

अकरावीचे प्रवेश ऑफलाईनच घेण्याची मागणी
Published on

सोमेश्‍वरनगर, ता. २३ : पालक, विद्यार्थी, शिक्षण संस्था अशा कुणाचीही मागणी नसताना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याने विद्यार्थ्यांची ससेहोलपट सुरू झाली आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी संख्येपेक्षा उपलब्ध जागांची संख्या अधिक असताना आणि ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा सक्षम नसताना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा घाट घालू नये. ऑफलाइन पद्धतीनेच प्रवेश करावेत, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याकडे केली आहे.
राज्य सरकारने अकरावीचे प्रवेश राज्यभर ऑनलाइन पद्धतीने करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तांत्रिक अडचणी सुरू झाल्याने प्रवेश प्रक्रिया गुरुवारी (ता. २२) सुरू होण्याऐवजी सोमवारपर्यंत (ता. २६) पुढे ढकलली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदनाद्वारे ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा सचिव प्राचार्य विक्रम काळे, कार्याध्यक्ष प्रा. राहुल गोलांडे यांनी दिली.
राज्यातील ग्रामीण भागात सर्वत्र इंटरनेट सुविधा नाही, आदिवासी, डोंगराळ भागात पालक अथवा विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड फोन नाहीत, ऑनलाइन प्रवेश पद्धतीचे ज्ञान विद्यार्थी, पालक अथवा शिक्षकांमध्ये पुरेशा प्रमाणात पोहोचविलेले नाही, खासगी सायबर कॅफेकडून अवास्तव रकमांची मागणी सुरू झाली आहे, शिक्षकांना केवळ या एका कामासाठी उन्हाळी सुट्टीत उपस्थित राहावे लागत असून त्यातून निष्पन्न काहीच होत नाही, अकरावीचे प्रवेश होऊन महाविद्यालय सुरू होण्यास विलंब होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे, अकारण खर्च होतो आहे, बेवसाइटच्या बिघाडामुळे प्रचंड संताप निर्माण झाला आहे, अशा कारणांमुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
प्राचार्य काळे म्हणाले की, विद्यार्थ्यांपेक्षा जागा अधिक असल्याने ऑनलाइनची आवश्यकताच नाही. पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्रवेश घटले आहेत आणि खासगी सेल्फ फायनान्स महाविद्यालयांमध्ये ओढा वाढला आहे. त्यामुळे मार्चमध्येच आम्ही शहरातील ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया रद्द करावी यासाठी निवेदन दिले होते. उलट ग्रामीणही ऑनलाइन केले. ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पाच-सहा हेलपाटे मारावे लागणार, आर्थिक तोशीस लागणार. एवढे करून महाविद्यालये उशिरा सुरू होणार. क्लासचालक व खासगींसाठी हे केले आहे काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com