

सोमेश्वरनगर/मंचर, ता. ९ : निंबूत (ता. बारामती) परिसरात दोन सराइतांना पुणे ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून सिनेस्टाइलने अटक केली. त्यांच्याकडून विविध ठिकाणच्या तीन खुनाच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
राजगुरुनगर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.१८) जैदवाडी (ता. खेड) येथील मोकळ्या जागेत धनंजय मारुती घेवडे (वय ३३, रा.राक्षेवाडी, ता.खेड, मुळगाव कारेगाव, ता.आंबेगाव) यांचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यावर व तोंडावर गंभीर मारहाण झाल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), खेड पोलिस व वडगाव निंबाळकर पोलिस यांनी सराइतांना अटक केली. ललित दीपक खोल्लम (रा. शिरोली ता. खेड) व नंदलाल दिलीप होले (रा. कोरेगाव ता. आंबेगाव) अशी सराईत आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर मकोकासह ३५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सुपारी देणारा नीलेश कैलास सणस (रा. कोरेगाव ता. आंबेगाव) यालाही अटक केली आहे.
घेवडे यांच्या खुनानंतर पोलिसांनी १४५ किलोमीटरमधील ११० सीसीटीव्ही कॅमेरे तपासत वडगाव निंबाळकरपर्यंत मागोवा घेतला. दोन्ही आरोपी निंबूत येथे ओळख लपवून राहात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून एलसीबी, खेड पोलिस व वडगाव पोलिस यांनी सापळा रचला. मात्र करंजेपूल, निंबूत, नीरा अशा तिन्ही ठिकाणी शस्त्रसज्ज आरोपी हातात येता येता सटकले.
दरम्यान, नंदलाल होले आणि नीलेश सणस यांचा मयत घेवडे याच्याशी किरकोळ वाद झाला होता. त्या रागातून सणसने दिलेल्या सुपारीवरून खोल्लम व होले यांनी घेवडे यांचा खून केल्याचे आरोपींनी कबूल केले. खोल्लम याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, घरफोडी तर होले याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. मध्य प्रदेशातून आणलेली दोन गावठी पिस्तुलेही आढळून आली.
आणखी दोन खुनांचा उलगडा
ललित खोल्लमचे खेड तालुक्यातील महिलेशी प्रेमसंबंध होते. ती आणि तिचा मुलगा पैसे मागत असल्याच्या रागातून खोल्लमने होले याच्या मदतीने सात नोव्हेंबरला मुलाचा खून करून राखेची नदीत विल्हेवाट लावली होती. संबंधित महिला वारंवार चौकशी करू लागल्यावर खोल्लम याने तिचाही खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.