

वाल्हे, ता१७ : शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून वाल्हे येथे बांधलेला पूल वाल्हेकरांसाठी असून अडचण नसून खोळंबा ठरला आहे. ठेकेदाराने मनमानी पद्धतीने केलेल्या या कामामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागते आहे. पावसाचे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होऊन पाणी ओढ्यात जाण्याचे नियोजनच नसल्याने गुरुवारी (ता.१७) केवळ १५ मिनिटे पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी पुलानजीक असलेल्या घरांत व दुकानामध्ये शिरले. तर पुलाशेजारीच असलेल्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत देखील या दूषित पाण्याचा निचरा होऊ लागल्याने गावाकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संभाव्य अडचणी बाबत काम सुरू असतानाच ‘सकाळ’ने आवाज उठवला होता व याची दखल घेत आमदार संजय जगताप यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर खडे बोल सुनावले होते. वाल्हे गावठाणलगत असलेल्या ओढ्यावर नवीन पुलाचे काम झाले आहे. मात्र हे काम निकृष्ट झाल्याचा आरोप आता ग्रामस्थ करत आहेत. कारण ओढ्याच्या बाजूला गावठाणात असलेल्या छोट्या व्यावसायिकांचा तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या सुरक्षिततेचा कोणताही विचार केला गेला नसल्याचे समोर आले आहे. ठेकेदाराने पुलाला केलेल्या तीव्र उतारामुळे मूळ जमिनीलगत खड्डा होऊन पावसाचे दूषित वाहत आलेले पाणी त्यात साठून ते लगतच्या दुकानांसह पाणी पुरवठ्याच्या विहिरीत मिसळत आहे. त्यामुळे वाल्हेकरांना पुन्हा एकदा साथीच्या आजारांना सामोरे जावे लागणार आहे.
ठेकेदाराचा उद्दामपणा आणि पुरंदर पंचायत समिती बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा यामुळे झालेले पुलाचे काम हे अशास्त्रीय पद्धतीने झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी ठेकेदार व बांधकाम विभागाचे अधिकारी यांना धारेवर धरले होतेच. लोकप्रतिनिधींनी आदेश देऊन तीन महिने लोटले तरी अधिकारी व ठेकेदार यांनी शब्द पाळला नाही. त्याचा दुष्परिणाम म्हणून आज जेमतेम पंधरा मिनिटांच्या झालेल्या पावसामुळे गावातून व इतर ठिकाणाहून या ठिकाणी येणारे पाणी सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीमध्ये निचरा होत असल्याचे निदर्शनास आले.
03663
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.