परराज्यांतील नागरिकांची चारित्र्य पडताळणी करा : रूपाली चाकणकर

परराज्यांतील नागरिकांची चारित्र्य पडताळणी करा : रूपाली चाकणकर
Published on: 

पुणे, ता. १७ : ‘‘राज्यातील कोपरखैरणे, उरण, बदलापूर आणि पुण्यातील बोपदेव घाट परिसरात लैंगिक अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपी परराज्यांतील आहेत. अशा घटनांमुळे पुण्यासह महाराष्ट्राची बदनामी होत आहे. त्यामुळे पोलिसांनी परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची चारित्र्य पडताळणी करावी. तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहे,’’ अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.

बोपदेव घाटातील तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत चाकणकर यांनी गुरुवारी (ता. १७) आयुक्तालयात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चाकणकर म्हणाल्या, ‘‘बोपदेव घाट लैंगिक अत्याचारासारख्या घटना पुन्हा घडू नयेत, याबाबत पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अंतर्गत परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी. सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. रस्त्यावर अंधार असलेल्या भागात पथदिवे बसविण्याबाबत महापालिकेला सूचना दिल्या आहेत. दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांची नोंद करण्याबाबत कामगार आयुक्तांना पत्र दिले आहे. पुण्यात शिक्षणासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना अशा धोकादायक ठिकाणांची माहिती नसते. अशा ठिकाणांबाबत महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अवगत करण्यात येत आहे.’’

मानकर यांच्या शहराध्यक्षपदासाठी पक्षाकडे शिफारस
राज्य महिला आयोगावर चाकणकर यांना पुन्हा संधी देण्यात आली. तसेच, विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या नियुक्तीवरून आक्षेप घेत दीपक मानकर यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात चाकणकर म्हणाल्या, ‘‘शहराध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीसाठी मी पक्षाकडे शिफारस केली. नियुक्ती पत्र देईपर्यंत चाकणकर भगिनी म्हणून त्यांच्याबरोबर होत्या. परंतु त्यांची अशा पद्धतीची वक्तव्ये आली आहेत. याबाबत मला काही समजले नाही. मी सविस्तर माहिती घेईन.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.