अग्रवाल यांना शिताफीने अटक

अग्रवाल यांना शिताफीने अटक
Published on

पुणे, ता. २१ : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला मोटार वापरण्यास दिल्याच्या गुन्ह्यात पसार झालेल्या ‘ब्रह्मा रियल्टी’चे नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून मंगळवारी (ता. २१) अटक केली. त्यांना बुधवारी (ता. २२) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे अग्रवाल यांना मंगळवारची संपूर्ण रात्र पोलिस कोठडीत घालवावी लागणार आहे.
कल्याणीनगर भागात रविवारी (ता. १९) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलिशान मोटारीने धडक दिली होती. या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा (दोघे वय २४, रा. मध्यप्रदेश) या दोन आयटी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात येरवडा पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाविरुद्ध (वय १७ वर्षे आठ महिने) गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाला, त्या वेळी विशाल अग्रवाल पुण्यातच होते. परंतु वाहन परवाना नसतानाही त्याला वडिलांनी गाडी चालविण्यास दिली, तसेच मद्यपार्टी करण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे वडिलांवरही गुन्हा होणार असल्याची कुणकूण लागताच अग्रवाल पुण्यातून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. अटकेनंतर त्यांना रात्री ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

अल्पवयीन मुलाला गाडी चालविण्यास देणे गुन्हा-
अल्पवयीन मुलाला गाडी चालविण्यास देणे हा बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७५ नुसार गुन्हा आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. परंतु ते पुण्यातून पसार झाले. पोलिसांनी अग्रवाल यांच्या नातेवाइकांची कसून चौकशी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसही झाले सावध
आरोपीला तत्काळ जामीन मिळाल्याने समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पोलिसांच्या भूमिकेबाबतही संताप व्यक्त होत होता. त्यामुळे पोलिसांनी सावध भूमिका घेत अग्रवाल यांना पहाटे ताब्यात घेतल्यानंतर कोणतीही घाई गडबड न करता पुण्यात आणले. युनिट चारच्या कार्यालयात चौकशीनंतर अटक करून सायंकाळी पोलिस आयुक्त कार्यालयात आणले. जेणेकरून सायंकाळी वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात दुसऱ्या दिवशी हजर करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com