

पुणे, ता. १० ः जंगली महाराज मंदिरासमोर ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांची सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. बुधवारी (ता. ९) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला.
याप्रकरणी ६३ वर्षीय ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला सहकारनगर भागात राहायला आहेत. श्री जंगली महाराज मंदिरात वार्षिक उत्सव सुरू आहे. त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तक्रारदार महिला एका भजनी मंडळात आहेत. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास त्या भजन करण्यासाठी मंदिरात गेल्या होत्या. भजन करून त्या पुन्हा बाहेर येत होत्या. दरम्यान, त्या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दोन लाख ४० हजारांचे दागिने हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. मात्र, चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग विभागाचे सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी जंगली महाराज रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित बडे तपास करत आहेत.
तरुणाला धमकावून दुचाकी चोरी
हडपसर भागात तरुणाला धमकावून त्याची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत २८ वर्षीय तरुणाने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तरुण हडपसर भागात राहायला आहे. मंगळवारी (ता. ८) रात्री साडेआठच्या सुमारास तो हडपसर भागातील क्रेझी कॅफेसमोर थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्याला धमकाविले. त्याला मारहाण केली. त्याच्याकडील दुचाकी ताब्यात घेतली. दुचाकी चोरून चोरटे पसार झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.