

पुणे, ता. १० : कोरोनापूर्वी आणि कोरोना सुरू झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या घरातील लग्न, मुंज, वाढदिवस, डोहाळे जेवण अशा विविध कार्यक्रमांसाठी हॉल बुक केलेले होते. मात्र, कोरोनामुळे ते कार्यक्रम रद्द झाल्याने तेव्हा भरलेले पैसे परत मिळावे म्हणून त्यासाठी अनेक ग्राहकांचा न्यायालयीन लढा सुरू झालेला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून २०२० मध्ये व त्यानंतर टप्प्या-टप्प्याने काही कालावधीसाठी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी काही नियम व अटी ठरवून देण्यात आल्या होत्या. कार्यक्रमासाठी किती माणसे उपस्थित असतील, हे देखील निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे निर्बंध असलेल्या काळातील अनेक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले किंवा रद्द केले होते. मात्र, या कार्यक्रमांसाठी हॉलचे पैसे आधीच भरलेले होते. हे पैसे त्यावेळी परत मागण्यात आले; पण हॉल चालकांनी कार्यक्रम रद्द केला तर आमचे पण नुकसान होर्इल. त्यामुळे नंतर तुम्ही उपलब्ध असलेल्या तारखांना तुमचा कार्यक्रम घ्या, अशी विनंती आयोजकांना केली होती. त्यानंतर काहींनी नंतर कार्यक्रम आयोजित केले. मात्र, काहींना परत कार्यक्रम घेणे शक्य न झाल्याने त्यांनी हॉल चालकांकडे पैशांची मागणी केली होती. त्याबाबत चर्चेतून मार्ग न निघाल्याने पैसे परत मिळावे, म्हणून काहींनी ग्राहक आयोगात धाव घेतली आहे.
मुंज रद्द झाल्याने हॉलचे पैसे मिळाले परत
कोथरूडमधील रहिवासी श्रीहरी पुजारी यांनी त्यांच्या मुलाची मुंज करण्यासाठी एक हॉल बुक केला होता. त्यासाठीचे ३० हजार रुपये त्यांनी एक नोव्हेंबर २०१९ ला जमा केले होते. मात्र, नऊ एप्रिल २०२० ला होणारा मुंजचा कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे त्यांनी रक्कम परत मिळण्याची मागणी करत आयोगात तक्रार दाखल केली होती. पुजारी यांनी कार्यक्रम रद्द केल्याचे वेळेत कळवले नाही व त्यांना यापूर्वी एकदा तारीख बदलून दिली होती, अशी भूमिका हॉल चालकाने घेतली. मात्र, ही भूमिका कायद्याला धरून नाही. तसेच कार्यक्रम घेऊन कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन योग्य नव्हते, असे नमूद करत ग्राहकाला पैसे परत करावेत, असा आदेश आयोगाने हॉलचालकाला दिला आहे.
मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी हडपसर परिसरातील एक हॉल बुक केला होता. कोरोनामुळे मोठे लग्न करणे शक्य नसल्याने आम्ही काही ठरावीक व्यक्तींमध्ये लग्न लावले. हॉलसाठी भरलेले काही पैसे परत मिळतील, असे त्यावेळी हॉल चालकाने सांगितले होते. मात्र, आता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे मी आता याबाबत आयोगात तक्रार करण्याच्या विचारात आहे.
- एक रहिवासी, हडपसर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.