

आपण एकटे प्रवास करून आलात; पण आता हजारो वाचकांना सोबत घेऊन पुन्हा प्रवासाला निघालात.
यापेक्षा लेखकासाठी मोठं समाधान काय असू शकतं?
टाक सरांनी प्रवास केला आहे;
आता आपण पुस्तक वाचायचं आहे.
तिकीट न काढता, सामान न घेता आणि घरातून न हलता!
---------------
कुतूहल संपलं की माणूस म्हातारा होतो.
वय वाढणं वेगळं आणि कुतूहल संपणं वेगळं.
एखादा माणूस पंचाहत्तरीचा असू शकतो आणि तरीही एखाद्या नव्या ठिकाणी जाऊन म्हणू शकतो—
“अरे वा! हे मला माहीत नव्हतं!”
तो तरुण आहे.
आणि एखादा पंचविशीतला माणूस म्हणतो—
“मला सगळं माहिती आहे.”
तर त्याचं वय पंचविशी असलं तरी मनाने तो आधीच निवृत्त झालेला असतो!
टाक सरांचा प्रवास मला या अर्थाने तरुण वाटतो.
कारण त्यात पाहण्याची इच्छा आहे.
जाणून घेण्याची इच्छा आहे.
नोंदवण्याची इच्छा आहे.
--------------
प्रवासवर्णन लिहिणारे अनेक लेखक असतात. पण प्रवास करून आल्यावर काही जण फक्त फोटो दाखवतात, काही जण अनुभव सांगतात आणि काही जण म्हणतात,अरे, काय सांगू तुला... अफलातून होतं! आणि पुढे काहीच सांगत नाहीत!
----------------------------
पण टाक सरांनी प्रवास केला, तो अनुभवला, तो लिहिला आणि त्यावर चित्रंही काढली. म्हणजे इतर लोक प्रवासातून आठवणी घेऊन येतात; टाक सर प्रवासातून लेख, चित्रं आणि अनुभवांची शिदोरी घेऊन आले आहेत.
जेव्हा एखादा वाचक हे पुस्तक हातात घेईल, एखादं पान वाचेल, एखादं चित्र पाहील आणि मनात म्हणेल—
“अरे वा! मलाही त्या ठिकाणी जावंसं वाटतंय!”
आणि एखादा दुसरा वाचक म्हणेल—
“मी तिथे गेलो होतो; पण मला हे असं दिसलंच नव्हतं!”
तेव्हा लेखकाचा प्रवास यशस्वी झाला, असं म्हणता येईल.
‘प्रवासायन’ची टॅगलाईन आहे— ‘निसर्ग, कला आणि संस्कृतीची अनुभूती.’
मला ही टॅगलाईन फार आवडली. कारण प्रवासात निसर्ग दिसतो, संस्कृती भेटते, कला अनुभवता येते; पण टाक सरांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट आहे— प्रवासात त्यांना लेखकही भेटतो आणि चित्रकारही जागा होतो!
-------------------------------
पर्यटनाला जाणाऱ्या माणसाला निसर्गापेक्षा फोटो काढण्याची जास्त घाई असते.
समोर धबधबा आहे. माणूस त्याच्याकडे पाहत नाही; आधी कॅमेरा काढतो.
मित्र म्हणतो,
“अरे, धबधबा बघ!”
तो म्हणतो,
“थांब! आधी फोटो काढतो. नंतर फोटोमध्ये बघू!”
------------------
"थांबा, आता हा फोटो बघा... यात मी कसा झाडाच्या आड लपलोय आणि मागे ती टेकडी कशी दिसतेय!" असं सांगत ते एकाच फोटोवर पंधरा मिनिटे प्रवचन देतात. आपण कसंबस उठायला लागलो की, "अरे थांबा, अजून पुढचे फक्त दोन हजार फोटो बाकी आहेत!" असा जीवघेणा दम देतात.
---------------
"अरे, कलंगुट बिचवर संध्याकाळी काय सनसेट असतो! आणि हे बघ, तिथल्या एका टपरीवरून मी एक हजार रुपयांना विकत घेतलेली शिंपल्यांची माळ!" असं म्हणून ते गळ्यात ती ओबडधोबड माळ अडकवून फिरतात. आपण म्हटलं, "अहो, ही माळ तर आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही बाजारात दहा रुपयांना मिळते!" तर ते डोळे मोठे करून सांगतात, "अरे पण ती समुद्राच्या खऱ्या वाळूतून आणलेली फीलिंग वेगळीच असते!"
------------
ती ''म्हाळसकांत चिक्की''ची चव काही वेगळीच असते भाऊ! गरम चहामध्ये ती बुडवून खाल्ली की काय सांगू..." असं म्हणून ते डबा उघडून त्यातील बारीक चुरा पाहुण्यांच्या हातावर बळच ठेवतात. सोबत स्ट्रॉबेरीचे जामचे असे काही डबे आणलेले असतात की पुढचे सहा महिने घरातल्या प्रत्येकाला पोळीला लावून तेच खात राहावं लागतं.
-------------
अरे, माथेरानच्या एका पॉईंटवर आम्ही एक घोडा घेतला. जाताना तो घोडा असा काही उधळला... मला वाटलं आज काही आपलं खरं नाही! पण मी पण पक्का शिवरायांचा मावळा, घोड्याचा पट्टा घट्ट धरून बसलो." असं सांगत ते असे हातवारे करत सांगतो. त्यानंतर त्याच घोड्यावर आधी ही बसली. नंतर घोडं बसलं. पुढे दोन तास झाले तरी घोडं उठायला तयार नव्हता. आता हा घोडेवाला आमच्याकडे नुकसानभरपाई मागतो, की काय अशी भीती मनात आली. त्यानंतर मी मिसेसला कधीही घोड्यावर बसायचा आग्रह केला नाही. फार फार तर तू हत्तीवर बस, असे मी तिला म्हटलं.
त्यावेळी त्यांच्या मिसेसने हूं. ते घोडं मरतुकडं तर होतं. त्यात माझं काय दोष. असं म्हणून तोंड फिरवलं. त्यामुळे मला पुढे नाश्ता तर सोडा पण चहापण मिळाला नाही.
----------------
केरळच्या बॅकवॉटर किंवा मुन्नारला जाऊन आलेले महाशय घरी आल्यावर थेट ''आयुर्वेदिक डॉक्टर'' बनतात.
"तिथल्या मसाल्यांच्या बागेतून मी अस्सल विलायची आणि काळी मिरी आणलीय. हे बघ, ही साधी मिरी नाही, ही तिथली खास ''ऑर्गॅनिक'' मिरी आहे!" असं म्हणून ते खिशातून एक पुडी काढतात आणि पाहुण्यांच्या नाकाजवळ नेऊन शिंका आणतात. चहा पितानासुद्धा "मुन्नारच्या चहाची पत्ती आणि आपली ब्रू पिशवी यात जमीन-अस्मानाचा फरक असतो" असं म्हणून अर्धा तास प्रवचन ऐकवतात.
---------------
"अरे, सर्वसामान्य रांगेत लोक कसे तुडवत पुढे जात होते! पण आमची ओळख होती म्हणून कशे थेट सुप्रसिद्ध महाद्वारातून आत गेलो बघ!" असे सांगत ते तिथल्या लाडूंच्या पिशव्यांची मोजदाद करायला लागतात. "हा मोठा लाडू अमुक एक काकूंसाठी, हा मधला कोणासाठी..." असं सांगत शेवटी स्वतःसाठी उरलेला एकमेव चुरा असलेला लाडू सगळ्यांना तुकडा-तुकडा खाऊ घालतात.
----------
आपण प्रवास केला, अनुभव घेतले, संकटांना सामोरं गेलात, त्या आठवणी शब्दांत उतरवल्या आणि त्यांना चित्रांची साथ दिली. आता हे सगळं वाचकांच्या स्वाधीन करत आहात.
आपल्या ‘प्रवासायन’चा हा प्रवास आनंदाचा, अनुभवाचा आणि साहित्यिक समृद्धीचा होवो, ही मनापासून शुभेच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.