

‘उजनी’तील प्रकल्पांविरोधात
३१ ऑक्टोबरला आंदोलन
ॲग्रोवन वृत्तसेवा
चिखलठाण : उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर, सौर ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, न्यूक्लियर पॉवर आणि बॅटरी प्रकल्पांना विरोध करण्यासाठी करमाळा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पांविरोधात ३१ ऑक्टोबरला हिंगणगाव येथील पुलावर तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
या आंदोलनाच्या नियोजनासाठी नुकतीच (ता. २२) कुंभेज फाटा येथे शेतकऱ्यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत सर्व राजकीय पक्ष आणि गट-तट बाजूला ठेवून आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी तालुक्यातील गावोगावी जाऊन जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले.
उजनी धरण परिसरात विविध औद्योगिक आणि ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, या प्रस्तावित प्रकल्पांमुळे धरणग्रस्त शेतकरी, स्थानिक मच्छीमार तसेच उजनीच्या पाण्यावर आणि पर्यावरणावर थेट अवलंबून असलेल्या इतर घटकांच्या जीवनावर आणि रोजगारावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
हे आंदोलन केवळ एका तालुक्यापुरते मर्यादित न राहता, करमाळा, माढा आणि इंदापूर या तीनही तालुक्यांतील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या जनआंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार आणि आमदार नारायण पाटील यांच्यासह इतर प्रमुख राजकीय नेतेही प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.