

प्रसन्नचित्त- सुवर्णा बोबडे
-------------
सुरुवात करायचीय पण...
-------------
एखादं काम आपल्यासाठी १०० टक्के उपयोगाचं आहे हे माहिती असतानाही आपण ते सुरूच करत नाही. कधी मनात पुरेशी प्रेरणा नसते... कधी ‘मूड’ नसतो किंवा कामाचा ‘फील’च येत नाही! यावर उपाय काय?
--------------
‘‘मॅडम, मला सगळं कळतं... पण सुरुवात होत नाही. मोटिव्हेशन येतं कधी कधी, पण टिकत नाही. बहुतेक माझ्यात आत्मविश्वास आणि क्षमता नाही. माझी हल्ली स्वतःवरच खूप चिडचिड होते...’’
हा संवाद ऐकताना जाणवतं की प्रश्न क्षमतेचा नसतो, तो बहुतेक वेळा सुरुवातीच्या त्या पहिल्या पावलाचा असतो. आपण अनेकदा चालायला सुरुवात करण्याआधीच उत्साह आणि आत्मविश्वास येण्याची वाट पाहात बसतो.
‘कृतीला सुरुवात केली की प्रेरणा मिळते’ (Action precedes motivation) हे लेखक रॉबर्ट जे. मॅकेन यांचं निरीक्षण. आपल्याला वाटतं की ‘प्रेरणा कृती घडवते’. प्रत्यक्षात कृतीच प्रेरणा निर्माण करते. आधी ‘पंप’ सुरू करावा लागतो मग प्रवाह निर्माण होतो! हे फक्त सैद्धांतिक नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यात दिसतं. व्यायाम, लेखन, कुणाला कॉल करणं, नवीन प्रोजेक्ट, अभ्यास... अशी अनेक कामं करायला हवी आहेत हे आपल्याला कळतं... पण हातून घडत नाही. कारण आपण ‘मूड’ची वाट पाहतो.
थोडं भौतिकशास्त्र आठवा- डोंगराच्या टोकावर ठेवलेला दगड; त्याच्यात गडगडत खाली येण्याची क्षमता आहे. पण तो हलत नाही. कारण त्याला पहिला धक्का मिळत नाही. एकदा का तो हलला, की स्थितिज ऊर्जा गतिज ऊर्जेत बदलते. गती तयार होते आणि नंतर वाटेतील अडथळे त्याला अडवू शकत नाहीत. त्याचा वेग कमी जास्त होतो- पण तो गतिशील राहतो. आपलंही कोणत्याही कृतीच्या बाबतीत अगदी असंच आहे. आपल्याकडे क्षमता आहे, पण सुरुवात नाही.
त्रिसूत्री
इथे पुढील संकल्पनांमधील महत्त्वाचा फरक समजून घ्यायला हवा- इच्छा (desire), प्रेरणा (motivation) आणि जाणीवपूर्वक कृतीची निवड (volition). आपल्याला अनेक गोष्टींबद्दल इच्छा असते- म्हणजे ‘फिट व्हायचं आहे’, ‘पुस्तक लिहायचं आहे’, ‘व्यवसाय सुरू करायचा आहे’, ‘नातेसंबंध सुधारायचे आहेत’. ही इच्छा. त्या गोष्टींचं महत्त्वही आपल्याला कळत असतं- म्हणजे ‘हे केलं तर फायदा होईल’, ‘हे माझ्यासाठी चांगलं आहे’- ही त्यामागची प्रेरणा. पण तरीही अनेकदा कृती होत नाही. कारण इच्छा आणि प्रेरणा असूनही तिसरी गोष्ट लागते- जाणीवपूर्वक कृतीची निवड. ‘मूड असो वा नसो, मी आत्ता हे पाऊल उचलणार’ ही जाणीवपूर्वक केलेली निवड.
एखाद्याला व्यायाम करायची इच्छा असते, ‘फिटनेस’चे फायदेही माहिती असतात, पण सकाळी गजर वाजल्यावर उठून शूज घालणं, ही ‘जाणीवपूर्वक कृतीची निवड’. म्हणजेच, इच्छा दिशा देते, प्रेरणा कारण देते; पण कृती सुरू करून देते ती ही जाणीवपूर्वक निवड.
अडते कुठे?
हा निर्णय/ निवड का होत नाही?... कारण आपल्या मेंदूचा भावनिक भाग तात्काळ ‘कम्फर्ट’ शोधत असतो. सुरुवात करताना थोडी अस्वस्थता, अनिश्चितता जाणवणार; प्रयत्न करावे लागणार, हे त्याला नको असतं. मग तो भावनेचा आवाज आपल्याला पटवून देतो- ‘आज नाही, उद्या करू’ किंवा ‘थोडा मूड आला की सुरू करेन नक्की. नाही तर कृतीचा दर्जा चांगला नसेल’ किंवा ‘असं ओढूनताणून करण्याला काय अर्थ आहे? आतून वाटायला हवं- ते नाही जाणवत. खरंच मला काय हवंय?’ वगैरे.
अनेकदा ही तयारीची कमतरता नसते, ती फक्त सुरुवातीपासून दूर राहण्याची सवय असते. हा आवाज चुकीचा नाही, तो आपल्याला आरामात आणि सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण तो कृती सुरू करण्यासाठी उपयुक्त नाही.
उदा. समजा- सकाळी लवकर उठायचं आहे. मन म्हणतं, ‘आणखी ५ मिनिटं.’ पण काही दिवस मात्र आपण विचार बंद करून उठतो आणि थेट बाथरूममध्ये जातो. काय झालं इथे? कृती आधी झाली, मूड नंतर आला. हेच कामाच्या बाबतीतही लागू होतं.
एक छोटा प्रयोग- स्वतःला सांगा: ‘मी फक्त १० मिनिटं कृती करणार.’ आणि स्वतःला परवानगी द्या- ‘१० मिनिटांनंतर पुढचं ठरवीन.’ असा अनुभव आहे की पुष्कळ वेळा आपण ते काम सोडत नाही. कारण सुरुवात हाच सगळ्यात मोठा अडथळा असतो. एकदा तो पार झाला की काम चालू राहण्याची शक्यता दाट होते. म्हणजे भावनिक भाग थांबायला सांगत असला तरी ‘जाणीवपूर्वक केलेली निवड’ आपल्या बाजूने वळवून आपण कृती सुरू करतो. मग ती गती हळूहळू प्रेरणेमध्ये बदलत जाते आणि कृती चालू ठेवण्यास मदत करते.
‘फील’ येईना?...
आपल्या मनात दोन वेगवेगळ्या यंत्रणा काम करत असतात. एक भावनिक- ज्याला ‘फील’ पाहिजे. दुसरी तार्किक- जी ‘प्लॅन’ करते, निर्णय घेते. आपण कामाची सुरुवात भावनिक भागावर सोडतो- म्हणून अडतो. जर सुरुवात तार्किक किंवा शारीरिक भागाने केली, तर भावनिक भाग नंतर साथ देतो.
धावपटूंचं उदाहरण घ्या- पहाटे ४ वाजता उठताना त्यांना रोज उत्साह वाटतच असेल का? तर कदाचित रोज नाही. पण ते शरीर हलवतात. काही मिनिटांत ऊर्जा तयार होते. याचाच अर्थ कृती प्रेरणा निर्माण करते.
अडथळा नेहमी ‘प्रेरणा नसणे’ हाच असतो असंही नाही. कधी कधी अडथळा असतो, अस्पष्टपणा आणि सुरुवातीचा वाटणार भार/ दबाव. आपण म्हणतो, ‘खूप काम आहे... कुठून सुरू करू?’ मग मेंदू पटकन एक सोपा निर्णय घेतो- ‘आत्ता नको’. कारण मेंदूला मोठं, अस्पष्ट काम दिसलं की तो थांबतो. पण तेच काम जर लहान आणि स्पष्ट केलं, तर तो साथ देऊ शकतो.
उदा. ‘प्रोजेक्ट सुरू करायचाय’. हे काम जड वाटतं. पण ‘पहिल्या स्लाईडचं शीर्षक लिहायचंय’- हे शक्य आहे. ‘फिट व्हायचंय’ हे मोठं आहे. पण ‘आज १० मिनिटं चालायचंय’ हे साधं आहे. म्हणजे प्रश्न प्रेरणेचा नाही, तर सुरवातीला वाटणाऱ्या ‘प्रेशर’चा आहे. जेव्हा सुरुवात स्पष्ट होते, तेव्हा कृती होते आणि कृती झाली की, गती तयार होते.
काय करावे?
पुढच्या वेळी ‘कुठून सुरू करू?’ हा प्रश्न आला की मोठं उत्तर शोधू नका. फक्त इतकं विचारा- ‘यातलं सर्वात छोटं पहिलं पाऊल कोणतं?’ तोच तुम्हाला मिळालेला ‘इनिशियल पुश’ (जसा डोंगरावरच्या दगडाला घरंगळण्यासाठी पहिला धक्का द्यावा लागतो तसा!) असतो. एकदा का तुम्ही हललात की गती तयार होते, आत्मविश्वास तयार होतो. आत्मविश्वास हा सुरुवातीला नसतो, तो तुम्ही कृती करत राहिल्याने तुम्हीच निर्माण करता.
म्हणून पुढच्या वेळी जेव्हा मन म्हणेल- ‘आधी फील येऊ दे!’ तेव्हा एक वेगळा निर्णय घ्या- ‘मी आधी कृती करणार.’ कारण खरं समीकरण सोपं आहे- ‘कृती आधी- प्रेरणा नंतर’. प्रेरणा ही सुरुवातीची अट नसते; ते कृतीला मिळालेलं बक्षीस असतं!
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.