

विलास सहकारी साखर
कारखान्याकडून गाळप सुरू
मराठवाड्यात उसाला सर्वाधिक भाव देण्याची परपंरा कायम राखणार
ॲग्रोवन वृत्तसेवा
लातूर : विक्रमी ऊस गाळप, उच्चांकी साखर उतारा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून निवळी (ता. लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याची आतापर्यंतची वाटचाल राहिली आहे. यंदाही ही परंपरा कायम राखत शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात सर्वाधिक भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिली.
कारखान्याच्या ऊस मोळी पूजन व २६ व्या गळीत प्रारंभप्रसंगी गुरुवारी (ता. २२) ते बोलत होते. कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, कारखान्याचे उपाध्यक्ष वैजनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. अमित देशमुख म्हणाले, सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना शेतकरी, ऊसतोड मजूर व कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची बांधिलकी कारखाना जपेल. अत्यंत कमी पाण्यात कष्टाने जोपासलेल्या उसाची वेळेत तोडणी करण्याला प्राधान्य दिले जाईल. मांजरा परिवारातील साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात उसाला प्रतिटन तीन हजार रुपये पहिली उचल देणार असल्याची घोषणा दिलीपराव देशमुख यांनी केली आहे. या घोषणेला बांधील राहून अंतिम ऊसदर मराठवाड्यात सर्वाधिक राहील, यासाठी प्रयत्न केले जातील. विक्रमी ऊस गाळप साध्य करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक दर देता यावा, यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा, असे आवाहन देशमुख यांनी केले. नदीजोड प्रकल्पासाठी मी केंद्रीय जलमंत्र्यांची भेट घेतल्याची डॉ. काळगे यांनी सांगितले. शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
साखर कारखानदारीसमोर अनेक अडचणी
साखर उद्योगात मोठी गुंतवणूक करून इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारलेले असताना सरकारने अचानक घातलेल्या निर्बंधांमुळे उद्योगासमोर अडचणी निर्माण होत आहेत. हे निर्बंध उठवून इथेनॉल निर्मितीला चालना देण्याची गरज आहे. शासनाकडून साखर कारखान्यांची वीज कमी दराने खरेदी करून अधिक दराने विकली जात असल्याने कारखान्यांना वीज विक्रीचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. सर्वसामान्य ग्राहकांना साखर माफक दरात उपलब्ध व्हावी. मात्र व्यावसायिक वापरासाठी विकल्या जाणाऱ्या साखरेला योग्य व अधिक दर मिळावा, साखर उद्योगाच्या आर्थिक स्थैर्यासाठी कच्च्या साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार देशमुख यांनी या वेळी केली.
फोटो ओळी agnltr_23october2026_2.jpg लातूर : तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ करताना संस्थापक अध्यक्ष आमदार अमित देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, वैशालीताई देशमुख, वैजनाथ शिंदे व संचालक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.