

पान १२ - २५ साठी
००००००००००००
भूमाता पुन्हा हसू शकेल...
--------------------
वनस्पतींच्या अवशेषांच्या शास्त्रोक्त कुजण्याच्या क्रियेतून कर्बवायू तयार होतो. कुजण्याची क्रिया खोलवर झाली तर हा कर्बवायू वर येऊन हवेत जाऊ शकत नाही. म्हणून कुजण्याची क्रिया वरच्या थरात होणे गरजेचे आहे. एकदल बरोबर द्विदल पिके घेतल्यास बाहेरून नत्र देण्याची गरज लागणार नाही. पिकाचे अवशेष कुजवत असता तयार होणाऱ्या खतातून गरजेइतका नत्र उपलब्ध होईल, असे निष्कर्ष कृषी अधिकारी एडवर्ड फॉल्कनर यांनी प्रत्यक्ष शेतीमधील प्रयोगातून सविस्तरपणे मांडले आहेत.
-----------------------
प्रताप चिपळूणकर, विजय कोळेकर
-----------------
भाग ः २
-----------
एडवर्ड फॉल्कनर यांनी ‘प्लोमॅन्स फॉली’ या पुस्तकातील ‘वातावरणाची इच्छा’ या प्रकरणात हवामान बदल हाच शेतीची दिशा आणि दशा ठरवतो हे लक्षात घेऊन बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी विना नांगरणीची शून्य मशागत शेती पद्धती कशी उपयुक्त ठरते, ते स्वानुभवावरून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पाऊस कधी पडेल हे शेतकरी ठरवू शकत नाही; पण पाऊस शेतात आल्यानंतर त्याचे काय होते यावर निर्णय घेऊ शकतो, असे फॉकनर सांगतात. पृष्ठभागावरील सेंद्रिय पदार्थ पावसातील खंडाच्या काळात पिकांना मदत करणारा ओलाव्याचा साठा म्हणून ते वर्णन करतात. अति पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी जलद निचरून जाते. नांगरलेल्या शेतातून बाहेर जाणारे पाणी गढूळ तर विना नांगरलेल्या शेतातून बाहेर जाणारे पाणी एकदम स्वच्छ असते.
निचरा पद्धतीमधील समस्या ः
‘भूमिगत निचरा पद्धती कशी फसवी’ होऊ शकते याबद्दल लेखक पुस्कामध्ये सविस्तर मार्गदर्शन करतात. त्याच्या मते जोपर्यंत घोड्याचा नांगर चालू होता, तोपर्यंत जमिनीतून निचऱ्याचा प्रश्न फारसा उपस्थित झाला नव्हता. टॅक्टरने नांगरणी सुरू झाल्यानंतर हा प्रश्न जाणवू लागला. तो सोडविणेसाठी कृत्रिम निचरा प्रणाली उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. अशा निचरा प्रणालीतूनही काही वेळा पाणी योग्य वेगात निचरून जात नाही अशा नोंदी आहेत. ओलसर जमिनीत पल्टी नांगराने नांगरताना तळात फाळ घासत जाऊन पाणी खाली निचरून जाणेचे मार्ग बंद होतात आणि फक्त बाष्पीभवनाचा मार्गच शिल्लक रहातो. गुरुत्वाकर्षाने पाणी खाली खेचले जाते. त्यासाठी योग्य मार्ग असणे गरजेचे आहे. सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या जमिनीत पाणी शोषले जाते तर कुजणारा पदार्थ असेल तर कुजणारी जीवाणू सृष्टी निचऱ्याचे मार्ग तयार करून देते. कृत्रिम खर्चीक टाईल बसविण्यासारखे खर्चिक निचरा प्रणाली मार्ग बसविण्यापेक्षा नैसर्गिक मार्गांचा शोध घेणे जास्त चांगले, असा त्यांचा अनुभव आहे.
जमिनीच्या प्रकारांचे काय?
नांगरणी आणि खोल मशागतीमुळे झालेल्या आणि होत असलेल्या नुकसानीचा सोदाहरण उहापोह केल्यानंतर लेखक ‘जमिनीच्या प्रकारांचे काय’ या प्रकरणात तत्कालीन जमीन सुधारण्यासाठी येणाऱ्या खर्चाबद्दल आणि सामान्य शेतकऱ्यांना तो कसा परवडणार? याबद्दल भाष्य करतात. त्यासाठी वेगवेगळ्या जमीन प्रकाराची उदाहरणे देत असतानाच सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन कशी काळीभोर असते आणि उत्पादकता कमी झाल्यावर तो रंग फिका होतो. याला कारण सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होते. जमिनीची उत्पादकता कमी झाल्यावर परत मूळ पदावर आणण्यासाठी काही महागडे उपाय सुचविले जातात. ते शेतकऱ्यांना परवडत नाहीत. इथे पुस्तकी अभ्यासापेक्षा प्रत्यक्ष शेतातील अभ्यास जास्त उपयोगी ठरतो.
‘कोल्स टू कॅसल’ म्हणजेच ‘कावडीने पाणी आणून समुद्राला वाहणे’ या प्रकरणात लेखक सांगतो, की निसर्गाने वनस्पतींसाठी केलेली कर्बाची व्यवस्था इतकी आहे, की तेथे पुन्हा बाहेरून कर्ब का टाकावा? येथे जमिनीच्या आरोग्याविषयी आणि पिकांच्या पोषणाविषयी लोकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी लेखकाने वनस्पतीच्या वाढीसाठी कर्बवायू कसा उपयुक्त आहे यावर भर दिला आहे. वनस्पतींच्या अवशेषांच्या शास्त्रोक्त कुजण्याच्या क्रियेतून कर्बवायू तयार होतो. कुजण्याची क्रिया खोलवर झाली तर हा कर्बवायू वर येऊन हवेत जाऊ शकत नाही. म्हणून कुजण्याची क्रिया वरच्या थरात होणे गरजेचे आहे. एकदल बरोबर द्विदल पिके घेतल्यास बाहेरून नत्र देण्याची गरज लागणार नाही. पिकाचे अवशेष कुजवत असता तयार होणाऱ्या खतातून गरजेइतका नत्र उपलब्ध होईल.
कर्बवायूचे कर्बआम्लात रूपांतर झाल्याने त्यात स्थिर अन्नद्रव्ये विरघळून पिकाला उपलब्ध होतील. नांगरलेल्या जमिनीत ओलावा संपल्याने कर्ब आम्ल तयार होत नाही. कर्बवायू हवेत उडुन जातो व अनद्रव्ये उपलब्ध होणे बंद होते. तव्याचा कुळव मारलेल्या रानात असे होत नाही. केशाकर्षणाने कर्ब वायूचे कर्ब आम्ल, यातून अन्नघटकांची उपलब्धता या तंत्राने विक्रमी उत्पादन मिळेल असे नाही. परंतू समाधानकारक नक्कीच मिळेल. या पद्धतीने वाढविलेले पीक थोडे फिकट हिरव्या रंगाचे असेल, तरीही उत्पादन चांगले मिळेल, रासायनिक खते वापरलेले पीक गडद हिरव्या रंगाचे दिसते, हा डोळ्यांना झालेल्या सवयीचा परिणाम आहे. सुरवातीला जास्त नत्राचा हप्ता दिल्यानंतर नंतर काही अडचणी आल्यातर मक्याची पाने जळतात. हवेत भरपूर नत्र आणि जमिनीत इतर अन्नद्रव्ये भरपूर आहेत, त्यांचा वापर करून घेण्यास शिकले पाहिजे.
किडींचे प्रस्थान आणि तणमुक्त शेती ः
लेखकाने पुस्तकाच्या शेवटच्या भागात ‘किडींचे प्रस्थान’ आणि ‘तणमुक्त शेती’ या दोन प्रकरणात जमिनीच्या आरोग्यानंतर कीड, रोगांचा प्रादुर्भाव आणि ताणांचा त्रास यांचा संबंध लेखकाने मातीच्या आरोग्याशी जोडला आहे. त्याबरोबरच मानवी आरोग्य हे जमिनीच्या आरोग्याशी कसे जोडले आहे ते देखील स्पष्ट केले आहे. लेखकाच्या मते रोग, किडींचा प्रादुर्भाव हवेतील बदलामुळे होतो, हा एक गैरसमज सर्वत्र पसरलेला आहे. जसजशा जमिनी खराब होऊ लागल्या तसे रोग-किडींचे प्रमाण वाढले आहे. खोल नांगरणी केल्याने रोग, किडींचे प्रमाण वाढत आहे. कृत्रिम खताच्या वापरातूनही रोग, किडींचे प्रमाण वाढत आहे. एके काळी अशी समजूत होती, की अंड्याच्या बलकात मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात. आज तसे राहिलेले नाही. कोंबडीला काय खाद्य दिले यावर हे अवलंबून असते. तसेच लोण्याची पौष्टिकता गायीला कोणता चारा मिळाला यावर अवलंबून असते. प्राणी स्वतः कोणतीच जीवनसत्त्वे तयार करू शकत नाहीत. तो खाद्यातून मिळवितो आणि तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करतो. यामुळे दुधातील दोष हे गायीने खाल्लेला चारा कोणत्या जमिनीतून निर्माण झालेला आहे, त्या जमिनीतील मातीपर्यंत पोहोचतो.
या साखळीत सर्वांत महत्त्वाचा घटक ‘माती’ आहे. काही भागात अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे पूर्वी कधीच दिसत नव्हती. ती आता दिसू लागली आहेत. पिकाप्रमाणे माणसातही कमतरतेची लक्षणे दिसू लागली आहेत आणि आता प्राण्यातही दिसू लागली आहेत. माणसाप्रमाणे प्राण्यांनाही आता बाहेर कृत्रिमरित्या तयार करून जीवनसत्त्वे दिली जात आहेत. जर जमिनीतून ती पिकांमार्फत योग्य प्रमाणात प्राण्यांना मिळू शकली, तर पुढील सर्व प्रश्न आपोआप संपून जातील. खाद्यातून समतोल पोषण भागविले जाणे गरजेचे आहे, हे काम जमिनीची योग्य निगा राखूनच होऊ शकणार आहे, असे अनेक प्रयोगातील निष्कर्षातून लेखकाचे मत झाले आहे.
तण मुक्त शेती ही कधीच असू शकणार नाही, याची लेखकाला ठाम खात्री आहे. नांगरणी केल्यामुळे जमिनीत तणांचे बी गाडले जाते आणि पुढे योग्य संधी मिळाल्यास उगवत रहाते नांगरणीमुळे आपणच तणांच्या बीयांचे पुनरुज्जीवन करीत असतो. धान्ये अगर गवत वर्गीय तणे ही हिरवळीच्या खतासाठी द्विदल कडधान्य वर्गीय पेक्षा जास्त उपयुक्त आहेत. ती सुद्धा जमिनीत दाबल्यानंतर हवेतील नत्र ओढून घेऊ शकतात. कुजण्यासाठी तणे जमिनीच्या वरचे थरात तव्याच्या कुळवाने दाबावीत. तणांची मुख्य पिकाशी स्पर्धा होणार नाही अशा पद्धतीने वाढवावीत. मुख्य पीक व तणांच्या मुळांनी मधली सर्व जागा व्यापून टाकावी, यामुळे अन्नांश निचरून जाणार नाहीत.
जमिनीचे आरोग्य सुधारा ः
पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाचे शीर्षक ‘भूमाता पुन्हा हसू शकेल’ असे आहे. लेखक येथे फारच आशावादी आहे. लेखक या प्रकरणाची सुरुवात ‘जगाच्या पाठीवरील कृषीच्या नाटकातील खलनायक म्हणजे पल्टी नांगर आहे’ अशी करतो आणि पुढे अमेरिकन शासनाने नांगरणीबद्दल भूमिका बदलल्यास कोणते सकारात्मक बदल होतील यावर भाष्य करतो. मातीचे आरोग्य सुधारल्यामुळे स्वस्त उत्पादन आणि मुबलक अन्न मिळेल, सर्वत्र हिरवाई असेल आणि पिके, पशुधन, प्राणी आणि प्रजा अधिक आरोग्यदायी जीवन जगेल अशा आशेसह लेखक वाचकांचा निरोप घेतो.
एडवर्ड फॉल्कनर यांच्या या पुस्तकाची पारायणे करून मागील ८० वर्षांत शंभरहून अधिक संशोधकांनी वेगवेगळे प्रयोग करून आपली मते मांडली आहेत. सर्वांनीच फॉल्कनर यांच्या नांगरणीशिवाय शेती पद्धतीला सहमती दर्शवली आहे. त्याप्रमाणेच अमेरिकाच्या सरकारने त्यांच्या शेती धोरणमध्ये मोठे बदल केले आहेत. आजमितीस जगातील शून्य मशागतीखालील एकूण क्षेत्रापैकी २१ टक्के क्षेत्र केवळ अमेरिकेत आहे, यावरून प्रस्तुत पुस्तकाचा प्रभाव लक्षात येऊ शकतो.
----------------------------------------------------------------------
संपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८
(प्रताप चिपळूणकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत. विजय कोळेकर हे कृषिविद्या तथा मृद् विज्ञान विशेषज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.