

68805
कुडाळ ः भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे स्वागत करताना माजी खासदार नीलेश राणे. शेजारी प्रभाकर सावंत, राजन तेली, संध्या तेरसे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
जिल्ह्यात भाजपचे काम कौतुकास्पद
चित्रा वाघ ः कुडाळात शक्ती वंदन मेळावा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः कोकणात होत असलेले मुलीच्या जन्माचे स्वागत असो, स्वाभिमानी कोकणी शेतकऱ्याच्या मनातील गोडवा असो किंवा कणखर-मेहनती कोकणी स्त्री असो, या सर्वांचे मी मनापासून कौतुक करते. सिंधुदुर्ग भाजप टिमचेही काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शक्ती वंदन मेळाव्यात केले.
कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्ती वंदन मेळावा झाला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळ-मालवण प्रभारी माजी खासदार नीलेश राणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, सावंतवाडी विधानसभा प्रभारी माजी आमदार राजन तेली, शक्तिवंदन जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस मंजुषा कुद्रीमोती, उपाध्यक्षा प्रज्ञा ढवण, जिल्हा समन्वयक आम्रपाली साळवी, अर्चना देसाई, प्रदेश सदस्य संध्या तेरसे, रश्मी लुडबे, दीप्ती पडते आदी उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्गातील सामाजिक, औद्योगिक संस्था व महिलांसाठी विशेष काम करणाऱ्या महिलांचा ‘शक्ती संगिनी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. चित्रा वाघ यांनी सिंधुदुर्गासह कोकण भागातील संस्कृतीचे भरभरून कौतुक केले. माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्या कामाचाही आवर्जून उल्लेख केला. त्यांच्याकडून पुढे आलेली धुरा समर्थपणे पेलणाऱ्या विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांचेही काम उत्तमरित्या सुरू असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी आणलेल्या मातृवंदना, इज्जत घर, उज्ज्वला गॅस, आयुष्मान भारत, स्वनिधी कर्ज योजना, लखपती दीदी यांसारख्या योजनांवर सविस्तरपणे चर्चा केली. जिल्हाध्यक्ष सावंत यांनी जिल्ह्यात नुकत्याच लर्निंग लिंक फाउंडेशनच्या माध्यमातून झालेल्या महिला सशक्तीकरण कार्यक्रम, जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालेल्या ई-कॉमर्स कार्यशाळा, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ग्रामोद्योग विकास योजना या सर्व उपक्रमांचा उल्लेख केला.
महिला जिल्हाध्यक्षा कोरगावकर यांनी जिल्ह्यातील महिलांच्या कामाचा आढावा दिला. सर्व महिलांच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देताना येत्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून भाजपचा उमेदवार भरघोस मतांनी निवडून देऊन पंतप्रधान मोदी यांना अपेक्षित ‘चारशे पार’चे बहुमत शंभर टक्के मिळणार, असा विश्वास व्यक्त केला. शक्तिवंदना जिल्हा संयोजक देसाई यांचा सत्कार वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. बांदा मंडल अध्यक्षा रुपाली शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. कुडाळ मंडल अध्यक्षा आरती पाटील यांनी आभार मानले.
.......................
चौकट
नारीशक्तीचा सन्मान
या कार्यक्रमात मेघा गांगण (कनकदुर्गा महिला औद्योगिक संस्था, कणकवली), प्रज्ञा ढवण (महालक्ष्मी महिला औद्योगिक संस्था, कणकवली), पूजा सरकारे (अध्यक्ष, मालवण बंदर जेटी स्टॉलधारक संघटना, मालवण), स्नेहल बांदिवडेकर (अध्यक्ष, सातेरी महिला विविध सहकारी संस्था मर्यादित, निरवडे), सुजाता देसाई (सुरंगी महिला औद्योगिक सहकारी संस्था, आसोली-वेंगुर्ले), संध्या तेरसे (अध्यक्ष, नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था कुडाळ), प्राची तावडे आदींना मान्यवरांच्या हस्ते शक्ती संगिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.