संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवा

संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवा
Published on: 

19658

संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवा
जिल्हाधिकारी पाटीलः बॅंक अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत निर्देश
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ः भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विविध बँकांमधून संशयास्पद आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आचारसंहिता कालावधीत सर्वं बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवावे आणि अशा सर्व व्यवहारांची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे निर्देश जिल्हा दंडाधिकारी अनिल पाटील यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी पाटील यांच्या अध्‍यक्षतेखाली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्‍या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍ह्यातील सर्व बॅंक अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मुकेश मेश्राम उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीत पैशांचा गैरवापर प्रभावीपणे रोखण्यासाठी आणि नि:ष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी काही पावले उचललेली आहेत. यामध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. ज्या खात्यातुन अनेक दिवसांपासून व्यवहार कोणतेही व्यवहार होत नसतील आणि आता अचानक त्या खात्यातून व्यवहार होत असतील, तर त्यावर बारकाईने लक्ष ठेवावा. उमेदवाराचे एक खाते असताना निवडणूक प्रक्रियेसाठी दुसरे खाते उघडायचे असल्यास त्यांना सहकार्य करावे. बँकेच्या एखाद्या शाखेत पैशांची मागणी अचानक वाढली आहे का, याबाबतही बँकांनी माहिती संकलित करावी. इतर दैनंदिन व्यवहारांवर देखील लक्ष ठेवावे. काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी. निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्‍या पैसे काढणे व पैसे भरणे व्‍यवहारांबाबत जिल्‍हास्‍तरीय निवडणूक खर्च नियंत्रण समितीस अवगत करावे. ''ई-एसएमएस''मध्‍ये दिलेल्‍या सूचनांचे पालन करावे. बॅंकांच्‍या नियमित व्‍यवहारांवर कोणतीही बंधने नाहीत. बॅंकांनी ही माहिती सादर करीत असताना सर्वसामान्‍य ग्राहकांना त्रास अथवा अडथळा होणार नाही, याची काळजी घ्‍यावी.’’
शेवाळे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील बँकांकडून होणाऱ्या व्यवहारांची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमांच्या व्यवहारांवर प्रशासन करडी नजर ठेवून आहे. यासाठी बँकांनी आपापल्या पातळीवर समन्वयक अधिकारी नियुक्त करावेत आणि या अधिकाऱ्यांनी संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून याबाबतची माहिती अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा प्रशासनाला तत्काळ द्यावी.’’
श्री. मेश्राम यांनी बैठकीच्या सुरुवातीला भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती उपस्थितांना दिली. सर्व बँक अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या कालावधीत अधिक सजगपणे काम करावे. एटीएम व्हॅनमधून रोख रक्कम घेऊन जाताना आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.