खारेपाटण टाकेवाडीत वार्षिकोत्सव उत्साहात

खारेपाटण टाकेवाडीत 
वार्षिकोत्सव उत्साहात
Published on

खारेपाटण टाकेवाडीत
वार्षिकोत्सव उत्साहात
तळेरे : खारेपाटण टाकेवाडी ग्रामस्थ मंडळातर्फे येथील श्री कुंभारदेव मंदिराचा वार्षिक उत्सव उत्साहात झाला. या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव यांसह युवा उद्योजक रुपेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उद्योजक सावंत यांनी, गावांतील इतर मंदिराप्रमाणे कुंभारदेव मंदिराचा जीर्णोद्धार होऊन ते नव्याने बांधणे गरजेचे आहे. याकरिता ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यास धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने ते पुढे येईल व गावच्या विकासाला हातभार लागेल, असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दक्षता सुतार, विजय सावंत, संतोष शेट्ये, बंटी गोसावी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात सकाळी ११ वाजता सामूहिक आरती, दुपारी महाप्रसाद व रात्री श्री महादेव प्रासादिक भजन मंडळ शिरवलीचे (ता. देवगड) बुवा सागर मोहिते व श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ मोसमचे (राजापूर-रत्नागिरी) बुवा मनोहर सरवणकर यांचा डबलबारी भजनाचा जंगी सामना झाला.
................
साहित्य प्रेरणा कट्ट्याचा
आज मासिक कार्यक्रम
सावंतवाडी ः आजगाव (सिंधुदुर्ग) येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सलग चौपन्नावा मासिक कार्यक्रम उद्या (ता. २७) दुपारी ४ वाजता सातार्डा येथील महापुरुष मंदिरात आयोजित केला आहे. प्रसिद्ध साहित्यिक (कै.) जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित ‘एक सायंकाळ साहित्यिकांच्या सहवासात’ या कार्यक्रमात साहित्य कट्ट्याचे सदस्य दळवींच्या कथा, नाटके, ललित व कादंबरी आदी साहित्याबद्दल बोलतील. सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या सहयोगाने होणाऱ्या या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर व टिळक ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी केले आहे.
........................
सोनुर्लीत मंगळवारी
नेत्र चिकित्सा शिबिर
सावंतवाडी ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सोनुर्ली-जाधववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन नवयुवक क्रीडा मंडळ, सोनुर्ली-जाधववाडीतर्फे मंगळवारी (ता. २९) केले आहे. सकाळी ९ वाजता ध्वजारोहण, ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, १०.३० वाजता आय केअर सावंतवाडी यांच्यातर्फे नेत्र चिकित्सा व मोफत औषधोपचार व रक्तदान शिबिर होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून सोनुर्ली हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक ॲड. प्रदीप सावंत, प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत ठाकूर, विशेष अतिथी सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, उपसरपंच भरत गावकर, पोलिसपाटील संदीप मोगम, सामाजिक कार्यकर्ते नागेश गावकर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४ वाजता जय भीम रॅली, ७ वाजता मुलांचे रेकॉर्ड डान्स, रात्री ८.३० वाजता सामूहिक भीमगीत गायनाचा कार्यक्रम होईल. या स्पर्धेसाठी अनुक्रमे ५०००, ३०००, २००० रुपये व सन्मानचिन्हे अशी बक्षिसे ठेवली आहेत.
........................
मळगावात ३ मे रोजी
‘वेडा चंद्रहास’ नाटक
सावंतवाडी ः श्री देव इस्वटी मळगाव-रेडकरवाडी येथे ३ मे रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी श्रींची महापूजा, रात्री ९ वाजता मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ मोरे (कुडाळ) यांचा ‘वेडा चंद्रहास’ हा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. यात आनंद कोरगावकर, बाळू कोचेरेकर, संतोष गावडे, रोशन शिरोडकर, रोहित नाईक, शैलेश महाडगूत, रामचंद्र शेटकर, सूर्यकांत पवार, शंकर वाळके आदी कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत. त्यांना हार्मोनियमवर आशिष तवटे, मृदंग पियुष खंदारे आणि तबल्यावर राजू तुळसुलकर साथ संगत करणार आहेत. हा कार्यक्रम रेडकरवाडी-मळगाव येथे होणार आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
..........................
न्हावेलीत विविध
धार्मिक कार्यक्रम
सावंतवाडी ः श्री देव टेमकरी देवस्थान, न्हावेली भोमवाडी येथे नूतनीकरण आणि सुशोभीकरण पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण महोत्सवाचे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या सहभागातून हे कार्यक्रम होणार आहेत. मंगळवारी (ता. २९) सकाळी ८ वाजता सर्व ग्रामदेवतांना आवाहनाने कार्यक्रमाची सुरुवात, ८.३० वाजता जलाभिषेक व लघुरुद्र शुद्धीकरण विधी, दुपारी १२.३० वाजता महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता सुहासिनींकडून पंचारती ओवाळणी व महाआरती, रात्री ७.३० ते १० या वेळेत श्री देवी सातेरी घोडेमुख प्रासादिक भजन मंडळ, मातोंड (बुवा विशाल घोगळे) आणि श्री देव समाधी पुरुष भजन मंडळ, मळगाव (बुवा गौरांग राऊळ) यांची भजने, बुधवारी (ता. ३०) अक्षय तृतीयानिमित्त सकाळी ८ वाजता अभिषेक, १० वाजता श्रींची महापूजा, दुपारी १२.३० वाजता महाआरती व महाप्रसाद, रात्री १० वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.
..................
नेहरू युवा केंद्र संघटन
उपसंचालकपदी घाटवळ
ओरोस ः भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय संलग्न नेहरू युवा केंद्र संघटनचे उपसंचालक के. के. घाटवळ पणजी (गोवा) यांच्याकडे नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्गचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. नुकताच त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. तरुणांना दिशा देण्याचे काम हाती घेऊन विविध उपक्रमांमधून दिशा देण्याचे काम करूया, असे विचार घाटवळ यांनी व्यक्त केले. श्री. घाटवळ यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा समन्वयक म्हणून काम केले होते. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर मास्टर ट्रेनर म्हणून योगदान दिले आहे. तसेच जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले होते. यामध्ये ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ अंतर्गत एकाच वेळी शंभर बंधारे बांधले होते. तसेच गुजरात भूकंपावेळी शेकडो युवकांना घेऊन महाश्रमदान शिबिरात भरीव योगदान दिले. जिल्ह्यातील क्षयरोग निर्मूलन, २००१ ची जनगणना पथनाट्य सादर करून जनजागृती केली होती. जिल्ह्यात राष्ट्रीय युवा एकात्मता शिबिर घेऊन जनजागृती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com