

उत्कृष्ट वैमानिक
अथर्व पाटील
रत्नागिरी ः शहरातील थिबा पॅलेस येथे राहणाऱ्या अथर्व पाटील या तरुणाने न्युझिलंड सरकारचा उत्कृष्ट वैमानिक पुरस्कार मिळवला. न्युझिलंडचे हवाई वाहतूकमंत्री जेम्स मिगर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन अथर्वला गौरवण्यात आले. त्याचे १२ वी पर्यंतचे शिक्षण रत्नागिरीतील गोगटे कॉलेजमध्ये झाले आहे.
त्याने न्युझिलंडमध्ये १९ महिन्यांचा वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्याची वैमानिक म्हणून चाचणी झाली. यामध्ये त्याची उत्कृष्ट वैमानिक म्हणून निवड झाली. उत्कृष्ट वैमानिकाबरोबरच उत्कृष्ट सीपीएल फ्लाईट चाचणीमध्येही त्याचा प्रथम क्रमांक आला. सोमवारी न्युझिलंड सरकारकडून त्याचा गौरव झाला आहे. यापूर्वी त्याने भारतातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची (डीजीसीए) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. भारत आणि न्युझिलंडमधील वैमानिक परीक्षा पास झाल्याने त्याला आता भारतासह न्युझिलंडमध्येही व्यावसायिक जेट किंवा मोठी विमाने चालवण्याचा परवाना मिळाला आहे. त्याने उत्कृष्ट वैमानिक पुरस्कार मिळवल्याने रत्नागिरीचे नाव देशासह न्युझिलंडमध्येही झाले आहे.
-----
ओबीसी संघटनांचे
तहसीलदारांना निवेदन
खेड ः ओबीसी समाजाला सतत दुर्लक्षित करण्याचे धोरण सहन केले जाणार नाही, असा इशारा देत ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना तत्काळ जाहीर करावी आणि जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम करावा, या मागण्यांसाठी कुणबी समाजोन्नती संघाच्या खेड शाखेतर्फे तहसीलदार सुधीर सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. पंतप्रधान, गृहमंत्री, भारताचे रजिस्ट्रार जनरल एवं जनगणना आयुक्त व मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी कुणबी समाजोन्नती संघाचे खेड तालुकाध्यक्ष कृष्णा आग्रे, संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष दीपक शिगवण, जि. प. सदस्य अजय बिरवटकर, रामचंद्र आईनकर, भिकू जाधव, श्याम गवळी यांच्यासह अन्य उपस्थित होते. कोकणातील सातही जिल्ह्यांतील तहसील कार्यालयांवर एकाचवेळी निवेदने सादर करून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करण्यात आला.
-----
अंधश्रद्धा निर्मूलनावर
रातांबी येथे कार्यक्रम
सावर्डे ः संगमेश्वर तालुक्यातील रातांबी येथे हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमधून यंदा अंधश्रद्धा निर्मुलनाचा सामाजिक संदेश देण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. बुधवारी (ता. १ एप्रिल) होणाऱ्या उत्सवात वीणापूजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद, जन्मकाळ सोहळा, सत्यनारायण पूजा तसेच काल्याचे कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. या शिवाय नमन सादर केले जाणार आहे. या उत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जादूटोणाविरोधी कायदा, अंधश्रद्धा व फसवणुकीपासून बचाव याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून, काही तथाकथित बाबा, बुवा, मांत्रिक व ज्योतिषी यांचे चमत्कार प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे उलगडून दाखवले जाणार आहेत. या प्रयोगांमागील वैज्ञानिक कारणे सोप्या भाषेत स्पष्ट करून नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन रातांबी ग्रामस्थ, पुणेकर मंडळ व महिला मंडळ यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.