शिरोडा येथील हल्ला प्रकरणी दोन्ही संशयित पोलिसांच्या ताब्यात

शिरोडा येथील हल्ला प्रकरणी दोन्ही संशयित पोलिसांच्या ताब्यात
Published on

शिरोडा येथील हल्ला प्रकरणी
दोन्ही संशयित पोलिसांच्या ताब्यात
शिताफीने अटक : पोलिस कोठडीत रवानगी
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ८ : शिरोडा-परबवाडा येथील श्रीनाथ उर्फ बबलू विजय परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणातील गेल्या १२ दिवसांपासून पसार असलेल्या दोन मुख्य संशयितांना जेरबंद करण्यात येथील पोलिसांना यश आले आहे. दर्शन दयानंद गडेकर (वय २५) आणि भूषण दयानंद गडेकर (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, सावंतवाडी तालुक्यातील बावळाट येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
शिरोडा परबवाडा येथे २६ मार्चला पूर्ववैमनस्यातून श्रीनाथ उर्फ बबलू परब यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात परब यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी समीर हरिश्चंद्र परब यांनी वेंगुर्ले पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, दर्शन आणि भूषण गडेकर यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा घडल्यापासून दोन्ही संशयित पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाले होते.
त्यांचे कोणतेही लोकेशन किंवा धागेदोरे मिळत नसताना पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले होते. दरम्यान, ते सावंतवाडी तालुक्यातील बावळाट-खालचीवाडी येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बावळाट येथे सापळा रचला. अत्यंत शिताफीने पोलिसांनी या दोन्ही भावांना ताब्यात घेतले आणि मंगळवारी (ता. ७) त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली. अटकेनंतर आरोपींना वेंगुर्ले न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षातर्फे आरती पवार यांनी युक्तिवाद करताना गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासाची गरज लक्षात घेता पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक ओतारी यांच्यासह उपनिरीक्षक योगेश राठोड, हवालदार प्रसाद कदम, योगेश राऊळ, स्वप्नील तांबे, पोलिस अंमलदार प्रथमेश पालकर, मनोज परुळेकर, महिला पोलिस सिंधू मोंगल आणि सलोनी कांबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com