पैसा बोलतो आपण ऐकतो

पैसा बोलतो आपण ऐकतो
Published on: 

पैसा बोलतो, आपण ऐकतो ?.................लोगो
(२ ऑक्टोबर टुडे ३)

दैनंदिन व्यवहारांतही ‘करा’चा वाटा

कराचा विचार करताना अनेकांच्या मनात सर्वप्रथम प्राप्तिकराचा विचार येतो. पगारातून टीडीएस कापला, व्यवसायात आगाऊ कर (ॲडव्हान्स टॅक्स) भरला किंवा वर्षाअखेरीस रिटर्न भरताना कराची रक्कम दिसली की “मी कर भरतो” ही जाणीव होते; पण प्रत्यक्षात कर भरणं इतक्यावरच मर्यादित नसतं. आपण कर फक्त वर्षातून एकदा भरत नाही; अनेकदा तो आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये शांतपणे सामावलेला कसा असतो, हे या लेखात पाहूया.
- rat८p२.jpg-
26O68538
- सीए वैभव देवधर

---
कराचे दोन मोठे प्रकार समजून घेणं इथे उपयोगी ठरतं. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे ज्याच्यावर कर लावला जातो तोच व्यक्ती किंवा संस्था तो कर भरते. उदाहरणार्थ, व्यक्तीच्या उत्पन्नावर लागणारा प्राप्तीकर (इन्कम टॅक्स), व्यवसायाच्या नफ्यावर लागणारा टॅक्स किंवा कंपनीच्या उत्पन्नावरचा कॉर्पोरेट टॅक्स. यात करदात्याला कराची जाणीव स्पष्ट असते. उत्पन्न किती, वजावट किती, कर किती हे गणित थेट दिसतं.
अप्रत्यक्ष कर मात्र वेगळ्या पद्धतीने काम करतो. आपण एखादी वस्तू खरेदी करतो, सेवा घेतो, बिल भरतो तेव्हा त्या किमतीत कराचा काही भाग समाविष्ट असतो. जीएसटी, इंधनावरील कर असे अनेक कर थेट आपल्या नावाने वेगळे भरले जात नाहीत; पण वस्तू किंवा सेवांच्या किमतीतून ते ग्राहकापर्यंत पोहोचतात म्हणजे कर भरला जातो; पण त्याची जाणीव नेहमी स्वतंत्रपणे होत नाही. साधं उदाहरण घ्या. मोबाईल रिचार्ज केला, औषधं घेतली, गाडीमध्ये इंधन भरलं, ऑनलाइन एखादी वस्तू मागवली किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवलो तर या व्यवहारांमध्ये विविध स्वरूपात कर असू शकतो. प्रत्येक वेळी आपण “कर भरतो आहे” असा विचार करत नाही; पण सार्वजनिक महसुलाच्या प्रवाहात आपला हिस्सा जात असतो म्हणून करदाता ही ओळख फक्त इन्कम टॅक्स भरणाऱ्यापुरती मर्यादित नाही. वस्तू आणि सेवा वापरणारा प्रत्येक नागरिक अप्रत्यक्षपणे करप्रणालीचा भाग असतो.
याचं उत्तम उदाहरण शेतकऱ्याचं आहे. शेती उत्पन्नावर सामान्यतः इन्कम टॅक्स लागत नाही म्हणून शेतकरी करव्यवस्थेबाहेर आहे, असं म्हणता येत नाही. तो बियाणं, खतं, कीटकनाशकं, औषधं, पंप, पाईप, ट्रॅक्टर, यंत्रसामग्री, डिझेल किंवा वाहतूक सेवा घेतो तेव्हा त्या वस्तू-सेवांच्या किमतीत कराचा काही ना काही भाग असतो म्हणजेच त्याच्या उत्पन्नावर प्रत्यक्ष कर नसला तरी त्याच्या खर्चातून तो अप्रत्यक्ष करप्रणालीत सहभागी असतो.
यातून एक महत्त्वाचा फरक लक्षात येतो. प्रत्यक्ष कर साधारणपणे उत्पन्नाशी जोडलेला असतो. जास्त उत्पन्न असेल तर कर भरण्याची क्षमता अधिक मानली जाते. अप्रत्यक्ष कर मात्र खर्चाशी जोडलेला असतो. वस्तू किंवा सेवा विकत घेतली की, कराचा भार किमतीत येतो. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असे सर्वजण अप्रत्यक्ष कर भरतात; फरक त्यांच्या वापराच्या प्रमाणात आणि प्रकारात असतो म्हणून करव्यवस्थेची रचना करताना न्याय, क्षमता आणि परिणाम यांचा विचार महत्त्वाचा ठरतो.
अप्रत्यक्ष करांचा आणखी एक पैलू म्हणजे ते किमतीत मिसळलेले असतात. त्यामुळे नागरिकाला सरकारला नेमका किती कर जातो आणि विक्रेत्याला किती किंमत मिळते, हे नेहमी स्पष्ट दिसत नाही. बिलावर जीएसटी दिसू शकतो; पण उत्पादनाच्या आधीच्या टप्प्यांतील अनेक खर्च आणि कर आधीच किमतीत सामावलेले असतात. म्हणूनच कराची चर्चा फक्त “माझ्या पगारातून किती टीडीएस कापला?” इथे थांबू नये. ती “मी ग्राहक म्हणून, मालक म्हणून, व्यावसायिक म्हणून आणि नागरिक म्हणून करप्रणालीत कुठे सहभागी आहे?” इथपर्यंत जायला हवी.
करव्यवस्था समजून घेतली की, एक गोष्ट स्पष्ट होते. कर हा केवळ वार्षिक विवरणपत्राचा विषय नाही. तो अर्थव्यवस्थेतील प्रत्येक व्यवहाराशी जोडलेला आहे. उत्पन्न मिळालं तर कराचा विचार होतो, खर्च केला तरी कराचा विचार होतो, मालमत्ता घेतली तरी कराचा विचार होतो आणि व्यवसाय केला तरी कराचा विचार होतो म्हणजे पैसा ज्या ज्या टप्प्यांत फिरतो तिथे तिथे करव्यवस्थेचा काही ना काही संबंध येतो. म्हणून “मी कर भरतो का?” हा प्रश्न अपुरा आहे. अधिक अचूक प्रश्न असा आहे की, “मी कर कोणत्या कोणत्या मार्गाने भरतो?” हा प्रश्न समजला की, कराविषयीचा दृष्टिकोन बदलतो. कर हा फक्त एकदाच कापला जाणारा आकडा राहत नाही; तो आपल्या उत्पन्न, खर्च, उपभोग आणि नागरिकत्वाशी जोडलेली सतत चालणारी आर्थिक प्रक्रिया ठरतो.

(लेखक सीए असून, रत्नागिरीत प्रॅक्टिस करत आहे.)
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com