धाराशिवच्या तीन हजार ८२४ आधार प्रमाणीकरण प्रलंबित
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंच्या लाभाला विलंब
धाराशिव, ता. २३ (बातमीदार) ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत धाराशिव तालुक्यातील १६ हजार १८० शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या चार याद्या शासनाने प्रसिद्ध केल्या आहेत. यापैकी १२ हजार ३५६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली असून, अद्याप तीन हजार ८२४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे. संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या गावातील सीएससी केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार आणि सहकारी संस्थांचे सहायक निबंधकांनी केले असून कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणीकरण अत्यावश्यक आहे.
अपुऱ्या पावसामुळे यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली. धाराशिव तालुक्यात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी शासनामार्फत लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या चार याद्यांमध्ये तालुक्यातील १६ हजार १८० शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी तीन हजार ८२४ शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नसल्यामुळे त्यांची पुढील प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. ही सुविधा पूर्णपणे मोफत असल्यामुळे कोणत्याही सीएससी केंद्रचालकाने आधार प्रमाणीकरणासाठी शुल्काची मागणी केल्यास संबंधित शेतकऱ्यांनी त्याबाबत तहसीलदाराकडे तक्रार सादर करावी. शेतकऱ्यांनी या प्रक्रियेसाठी कोणालाही पैसे देऊ नयेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तालुक्यातील एकूण एक हजार ४५५ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अद्याप तयार झालेले नाहीत. या शेतकऱ्यांनीही तातडीने आपला फार्मर आयडी काढून घ्यावा आणि त्यानंतर आवश्यक आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. शासनाच्या कर्जमुक्ती योजनेत नाव समाविष्ट असूनही केवळ आधार प्रमाणीकरण किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभासाठी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी संबंधितांनी तातडीने कार्यवाही करावी. आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या तीन हजार ८२४ शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सीएससी केंद्राशी संपर्क साधावा. फार्मर आयडी नसलेल्या एक हजार ४५५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार आणि सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.
---------
वारस नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करा
कर्जमुक्ती योजनेच्या प्रसिद्ध झालेल्या लाभार्थी याद्यांमध्ये काही मयत शेतकऱ्यांची नावेही समाविष्ट आहेत. अशा शेतकऱ्यांच्या कायदेशीर वारसांनी संबंधित बँक शाखेत जाऊन आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करावीत आणि वारस नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.