हे मजचिस्तव जाहले । परी, ए आय ने केले ।।

हे मजचिस्तव जाहले । परी, ए आय ने केले ।।
Published on: 
फोटो ABD26J81995 ((सायबर अलर्ट)) --- न्यायालयात रंगतेय कादंबरीकार एआय विरुद्ध साहित्यिकांची लढाई ! ------ एआय आजकाल कथा, कादंबऱ्या आणि ललित लेखनही करत आहे. इतकेच नव्हे तर एआयजनित साहित्यकृतींचा सन्मान करण्याबाबत काही साहित्य मंडळे पुढाकार घेत आहेत. फ्रान्समध्ये नुकताच घोषित झालेला ‘प्रिक्स पास्कल दे लिटरेचर आयए’ हा पुरस्कार खास कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने लिहिलेल्या पुस्तकांसाठी दिला जाणार आहे. पण, दुसरीकडे मानवी प्रज्ञा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील संघर्ष आता साहित्यवर्तुळातही चर्चेचा विषय ठरतोय. ‘अकॅडमी गॉनकोर्ट’ ही पॅरिस येथील एक साहित्य संस्था. फ्रान्समध्ये मानाचा समजला जाणारा ‘प्रिक्स गॉनकोर्ट’ हा साहित्यविश्वातील प्रतिष्ठित पुरस्कार ‘कादंबरी’ या साहित्य प्रकारास दिला जातो. या पुरस्काराच्या नामांकनांमधील एक नाव यावर्षी वादग्रस्त ठरले. ‘एकतर हे, नाहीतर मृत्यू’ अशा आशयाचे या कादंबरीचे शीर्षक. तिचे लेखक ओरलिएन हे मूळचे कॅनडाचे व हैती येथील रहिवासी. हैतीपासून फ्रान्स देशी स्थलांतरितांचे अनुभव यावर ओरलिएन यांची कादंबरी आधारित. प्रकाशनापश्चात वाचकांमध्ये ती लोकप्रिय ठरली. ‘प्रिक्स दू रोमन’ हा प्रतिष्ठेचा सन्मानही तिला मिळाला. परंतु, सप्टेंबर महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका निनावी पोस्टमुळे साहित्यविश्वात याच कादंबरीवरून खळबळ माजली. पुस्तकातील काही परिच्छेद हे एआयच्या साह्याने लिहिल्याबाबत आरोप झाला. ओरलिएन यांनी त्याचे खंडन केले. संशोधनपर अभ्यास करताना केवळ काही मूलभूत संकल्पनांचा परामर्श घेण्यासाठी आपण एआयची मदत घेतली, २०१९ साली जेव्हा आपण लेखनास आरंभ केला, त्यावेळी तर एआय आलेलेदेखील नव्हते, असे ते म्हणाले. पण, झाल्या प्रकारामुळे ‘प्रिक्स गॉनकोर्ट’ या पुरस्काराच्या शर्यतीतून ओरलिएन यांच्या कादंबरीस बेदखल करण्यात आले. एका बाजूला एआयजनित साहित्यकृतींचा उचित सन्मान करण्यास साहित्यमंडळे सकारात्मक होत आहेत, तर दुसरीकडे ज्येष्ठ कादंबरीकार जॉन ग्रिशम, जॉर्ज मार्टिन, जोनाथन फ्रन्झन यांनी आपल्या अनुमतीशिवाय एआयला प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या साहित्याचा वापर केल्याबद्दल संबंधित प्रकाशकांविरुद्ध नुकसानभरपाई मागणारे दिवाणी दावे दाखल केले आहेत. विनापरवानगी एखाद्याच्या साहित्याचा परस्पर वापर करणे, हा कॉपीराइट कायद्याचा भंग ठरतो व संबंधित लेखक हा त्यासाठी आर्थिक नुकसानभरपाईची मागणी करू शकतो. मानवी प्रज्ञा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील हा संघर्ष दिवसेंदिवस रंजक होत आहे. - ॲड. चैतन्य धारूरकर ९३२५२१३७५९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com