पूर्णा पोलिस ठाण्यात विशेष
सायबर जनजागृती संवाद
--------------------
पूर्णा, ता.८ (बातमीदार): अलीकडील काळात सायबर गुन्हेगार ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात लक्ष करीत आहेत.त्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांपासून ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी येथील पोलिस ठाण्यातर्फे विशेष सायबर जनजागृती संवादात्मक शिबिर घेण्यात आले.
पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.सहा) आयोजित शिबिरास पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी सिंगनवाड, मोहीद खान यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी डिजीटल अरेस्ट, पेन्शन फ्रॉडपासून नागरिकांनी कसे सावध रहावे हे सांगत. ‘जागरूक रहा सुरक्षित रहा, सायबर सुरक्षित महाराष्ट्र सुरक्षित, असा संदेश देत सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ, सेवानिवृत्तांना भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून ‘डिजीटल अरेस्ट’चा प्रकार केला जात असल्याची माहिती दिली. पोलिस, सीबीआय किंवा अन्य तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना अटक करण्याची धमकी दिली जाते. त्यानंतर मोठ्या रकमेची मागणी केली जाते. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सचिन बेंद्रे यांनी केले. पेन्शन, ग्रॅच्युइटी, बँक खात्यांशी संबंधित फसवणूक कशी ओळखावी, अनोळखी व्यक्तींशी ओटीपी, बँक खाते अथवा अन्य गोपनीय माहिती शेअर करू नये, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास किंवा संशयास्पद कॉल आल्यास नागरिकांनी तातडीने केंद्र सरकारच्या १९३० या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा (www.cybercrime.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी असे आवाहन प्रास्ताविकात शिवाजी सिंगनवाड यांनी केले. सुत्रसंचलन जगदीश जोगदंड यांनी केले. लक्ष्मण वांगे यांनी आभार मानले.
----------------