कर्जमुक्तीच्या चौथ्या यादीमध्ये
४७ हजार शेतकऱ्यांना दिलासा
--
छत्रपती संभाजीनगर, ता. २३ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या चौथ्या यादीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील ४७ हजार ५४७ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक १७ हजार ४८४ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यातील १२ हजार ९२६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने गुरुवारी (ता. २२) चौथी यादी प्रसिद्ध केली. एकापेक्षा अधिक बँकांमध्ये पीक कर्जखाती असलेल्या आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांचा या यादीत समावेश आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरनंतर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जालन्यातील १२ हजार ९२६ शेतकऱ्यांचा या चौथ्या यादीत समावेश केला असून, पाठोपाठ बीड जिल्ह्यातील चार हजार ७९१, नांदेडमधील चार हजार १६१, परभणीतील दोन हजार ९८६ आणि लातूरमधील दोन हजार ५२९ शेतकरी पात्र ठरले आहेत. शिवाय धाराशिव जिल्ह्यातील एक हजार ६६१, तर हिंगोली जिल्ह्यातील एक हजार नऊ शेतकऱ्यांचा यादीत समावेश आहे.
---
आधार प्रमाणीकरणानंतर मिळणार लाभ
यादीतील शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी तपासून आपल्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रावर’ जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्जखात्यात जमा केली जाणार आहे. लाभार्थींची ही यादी बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
---
तीन याद्यांत २४.६७ लाख शेतकरी पात्र
यापूर्वीच्या तीन याद्यांमध्ये राज्यातील २४ लाख ६७ हजार १३० पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. आता या चौथ्या यादीमुळे मराठवाड्यातील आणखी हजारो शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची संधी उपलब्ध झाली आहे.