जागतिक बाजारपेठेत धाराशिवच्या फळांना संधी
- ‘ट्रेसिबिलिटीनेट’ अंतर्गत निर्यातक्षम फळबागांची नोंदणी सुरू
- द्राक्षांसाठी १ नोव्हेंबर, तर आंब्यांसाठी १ जानेवारी २०२७ पर्यंत नोंदणीची मुदत
सकाळ वृत्तसेवा ः
धाराशिव, ता. २४ ः गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंबा, द्राक्ष, डाळिंब व लिंबूवर्गीय फळबागांची लागवड झाली आहे. येथील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे या फळांना आता जागतिक बाजारपेठेत जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी २०२६-२७ या वर्षासाठी ‘ट्रेसिबिलिटीनेट’ अंतर्गत निर्यातक्षम फळबागांच्या ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सध्या युरोपीय देशांसह जागतिक बाजारपेठेत अन्नसुरक्षेबाबत कडक नियम लागू करण्यात आले आहेत. फळे आणि भाजीपाल्यामधील कीटकनाशकांचे उर्वरित अवशेष निर्धारित मर्यादेत राहणे बंधनकारक आहे. केंद्र शासनाच्या ‘सुरक्षित अन्न पिकवा’ या संकल्पनेअंतर्गत आणि ‘अपेडा’च्या मार्गदर्शनाखाली शेतमालाची गुणवत्ता व सुरक्षितता तपासण्यासाठी ही डिजिटल नोंदणी प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. द्राक्षबागांसाठी विहित नमुन्यातील अर्ज, शेतदर्शनाचा नकाशा, ७/१२ उतारा, ८-अ उतारा आणि ५० रुपये नोंदणी शुल्क. (जुन्या नोंदणीचे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक आहे.)यासह आंबा व इतर फळबागांसाठी ७/१२ उतारा, ८-अ उतारा, ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे लागतील. संबंधित फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी पुढील वर्षासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रीया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------
पिकांनुसार नोंदणीची मुदत
- द्राक्ष (ग्रेपनेट) : १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६
- आंबा (मॅंगोनेट): १ ऑक्टोबर २०२६ ते १ जानेवारी २०२७
...
खालील इतर फळे ः (वर्षभर नोंदणी सुरू):
- डाळिंब - अनारनेट
- भाजीपाला - व्हेजनेट
- संत्रा, मोसंबी, लिंबू - सिट्रसनेट
- कांदा - ओनियननेट
- केळी व इतर फळे - अदरफ्रूटनेट
........
प्रतिक्रिया ः
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळे व भाजीपाल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी, निर्यातीच्या संधी वाढून शेतमालाला योग्य दर मिळावा, या उद्देशाने निर्यातक्षम फळबागांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निर्धारित वेळेत आपल्या बागांची नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.’’
— सागर खटकाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव.