‘दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा द्यावा’
गेवराई ः यंदा दुष्काळामुळे शेतकरी आणि कामगारांसमोर दिवाळी साजरी करण्याचे संकट उभे राहिले आहे. या गरजू घटकांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळीपूर्वीच १०० रुपयांत आनंदाचा शिधा वाटप करावा, अशी मागणी समता सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जे. डी. शाह यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. वाढती महागाई, शेतीतील घटलेले उत्पन्न आणि हाताला नसलेले काम यामुळे गोरगरीब जनता हतबल झाली आहे. त्यामुळे केवळ घोषणा न करता सरकारने तातडीने निर्णय घेत जनतेला प्रत्यक्ष मदत करावी, अशी आग्रही मागणी शाह यांनी केली आहे.
------
राज्यस्तरीय हर्डल्स स्पर्धेसाठी भक्तीची चक्कर हिची वड
गेवराई ः येथील जिल्हा परिषद माध्यमिक कन्या प्रशालेची इयत्ता आठवीतील १४ वर्षीय विद्यार्थिनी भक्ती संतोष चक्कर हिची २०० मीटर हर्डल्स धावण्याच्या शर्यत प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीमुळे भक्ती आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत बीड जिल्ह्याचे अधिकृत प्रतिनिधित्व करणार आहे. गेवराई तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातून पुढे येत भक्तीने क्रीडा कौशल्याच्या जोरावर राज्यस्तरापर्यंत मजल मारली. या यशामुळे गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. भक्तीला शाळेचे मुख्याध्यापक विष्णू सोळुंके यांचे पाठबळ लाभले. क्रीडा शिक्षक अनिल घोडके यांनी प्रशिक्षण दिले. या निवडीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. राज्यस्तरीय स्पर्धेत भक्ती उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
------
पवन चांडक वाचन प्रेरणा सन्मानाने गौरवान्वित
बीड ः ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून वाचनसंस्कृती वाढवली. या कामासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च ॲण्ड चॅरिटीज एचएआरसी परभणीचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक यांना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संचालनालयातर्फे वाचन प्रेरणा सन्मान-२०२६ प्रदान करण्यात आला. गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी चर्नीरोड, मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम झाला. सन्मानचिन्ह देण्यात आले. सन्मानपत्र, ग्रंथभेट, दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. व्यासपीठावर विकासपरिषद उपसभापती शशिकांत अहेर उपस्थित होते. शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रा. अस्मिता वैद्य, मराठी भाषा संचालक अण्णा पेंढे, उपसंचालक नामदेव भोसले, डॉ. नितीन शिंदे, रामदेव कोळी आदींची उपस्थिती होती.
------
तुंबलेल्या नाल्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव
बीड ः शहरातील विविध भागांतील नाल्या तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तुंबलेल्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती होत असून, यामुळे साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता आहे. नगर परिषद प्रशासनाने नाल्यांची तातडीने सफाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
-----
लिपिकांनी अद्ययावत कौशल्ये आत्मसात करावीत
बीड ः बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात लिपिकांनी अद्ययावत संगणकीय ज्ञान व प्रशासकीय कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव सानप यांनी केले. तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात कर्तव्य, शिस्त व लिपिकांच्या कौशल्याचा विकास या कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य निकाळजे डी. जी. होते. प्रमुख उपस्थितीत डॉ. सुनील जोंधळे, प्रो. अर्जुन राठोड, डॉ. अश्विनी बेंद्रे, उपप्राचार्य अंकुश सुर्वे आणि राऊत डी. डी. होते. लिपिकांच्या अचूकतेमुळे कामकाज गतिमान होते, असे सानप म्हणाले. तसेच, बी. डी. पांचाळ यांनी शिष्यवृत्तीच्या विविध योजना आणि ऑनलाइन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
------
बसस्थानकासमोरील जालना मार्गावर अपघाताचा धोका
बीड ः शहरातील बसस्थानकाच्या समोरील जालना रस्त्यावर असलेल्या वळणावर दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी बस प्रवासी व बीड शहरातील नागरिकांकडून केली जात आहे. सदरील ठिकाणावरून वाहने एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे वळतात. रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्याचप्रमाणे बसस्थानकातून बसेस ये-जा करत असतात. अशा वर्दळीत भरधाव वेगाने धावणारी दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने पादचाऱ्यांसाठी अडचणीची ठरतात. या भागात वाहनांचा वेग नियंत्रणात असायला हवा, परंतु रस्त्यावर तशी व्यवस्था नसल्याने वाहने भरधाव वेगात चालवली जातात. यासाठी प्रशासनाकडून सदरील ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
--------
कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर वादविवाद स्पर्धा
केज ः तालुक्यातील बनसारोळा येथील जनविकास महाविद्यालयात शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी पूज्य मनोहरराव अण्णा गोरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचा विषय कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भारतीय विकासाला चालना मिळत आहे की नाही, असा आहे. प्रथम सांघिक पारितोषिक ११ हजार रुपये व करंडक ठेवण्यात आले असून, द्वितीय सांघिक पारितोषिक ९ हजार रुपये व करंडक आहे.
------
माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात
बीड ः माउली विद्यापीठ संचलित महिला कला महाविद्यालयात गुरुवार (२२ ऑक्टोबर) रोजी माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. प्रास्ताविकात डॉ. बबन बोबडे यांनी विद्यार्थिनींना एकत्र आणणे व अनुभव शेअर करणे हा मेळाव्याचा हेतू असल्याचे सांगितले. यावेळी बोंगाणे आदिती, पोढार पूजा, घोडके प्रिया व घोडके वैष्णवी यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाचे आभार मानले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. संध्या आयस्कर यांनी मार्गदर्शन करताना, माजी विद्यार्थिनींनी नेहमी महाविद्यालयाशी जोडलेले राहावे आणि सध्याच्या विद्यार्थिनींना व्यावसायिक अनुभव सांगावेत, असे आवाहन करत ध्येय निश्चित करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. बबन बोबडे यांनी मानले. प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
----------