लाभार्थी शेतकऱ्यांना पीककर्जासाठी विलंब
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शिराढोण शाखेला टाळे ठोकण्याचा इशारा
कळंब, ता. ८ (बातमीदार) : शासनाकडून कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज देण्यास महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शिराढोण शाखेकडून विलंब होत असल्याचा आरोप शिवसेना उद्योग सहकार सेनेने केला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अन्यथा शिराढोण शाखेला टाळे ठोकण्याचा इशारा संघटनेने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लातूर येथील प्रादेशिक व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे दिला आहे.
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांकडून पुन्हा अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करता ‘फार्मर आयडी’च्या आधारे कर्जवाटप करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक जुने खातेदार कर्जासाठी बँकेत जात असताना त्यांच्याकडून नव्याने विविध कागदपत्रे मागितली जात असल्याने त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दुष्काळामुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. कर्जासाठी बँकेत हेलपाटे मारूनही समाधानकारक माहिती मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे. कर्जवाटपाची प्रक्रिया सुलभ करून पात्र शेतकऱ्यांना तातडीने कर्ज द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शाखा व्यवस्थापकांकडून शेतकरी व ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागणूक मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली. निवेदनावर नामदेव माकोडे, सोनाली शिंदे, उषाताई पालकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
...............
धनादेश अनादरप्रकरणी एकास दोन लाखांचा दंड
वाशी न्यायालयाचा निकाल; रक्कम न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास
वाशी, ता. ८ (बातमीदार) : हातउसने घेतलेली एक लाख रुपयांची रक्कम परतफेड करण्यासाठी दिलेला धनादेश अनादर झाल्याच्या प्रकरणात वाशी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपी अजय अशोक बाबर यास दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम एक महिन्याच्या आत जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून, रक्कम न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे.
अमर रामराजे चेडे यांनी मित्र अजय बाबर यास गरजेपोटी एक लाख रुपये हातउसने दिले होते. सदर रक्कम एक महिन्यात परत करण्याचे ठरले होते. मात्र, मुदतीत रक्कम परत न करता बाबर यांनी चेडे यांना त्यांच्या बँक खात्यावरील एक लाख रुपयांचा धनादेश दिला. चेडे यांनी धनादेश बँकेत वटण्यासाठी जमा केला असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो अनादरित झाला. त्यानंतर चेडे यांनी बाबर यांना कायदेशीर नोटीस बजावून धनादेशाची रक्कम अदा करण्याची मागणी केली. मात्र, रक्कम न मिळाल्याने त्यांनी वाशी न्यायालयात खटला दाखल केला.
फिर्यादीतर्फे सादर पुरावे आणि विधिज्ञ ॲड. प्रताप कवडे यांनी युक्तिवाद केला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. जी. जगताप यांनी ५ ऑक्टोबरला धनादेश अनादरप्रकरणी एकास दोन लाखांचा दंड ठोठावल्याचा निकाल दिला. फिर्यादीतर्फे ॲड. अमित मोटे यांनी सहकार्य केले.
......................
पाठपुराव्यानंतर सावरगावात ई-पिक पाहणी सुरू
भूम, ता. ८ (बातमीदार) : खरीप हंगाम सुरू झाल्यापासून तालुक्यातील सावरगाव (दे.) येथील शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी मॅपिंगअभावी रखडली होती. ई-पिक पाहणीची नोंद न झाल्याने पीक विमा, शासकीय अनुदान तसेच विविध कृषी योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या दालनात आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
ई-पिक पाहणीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर बुधवारी (ता. ७) सावरगाव (दे.) येथे ई-पिक पाहणीच्या मॅपिंगला सुरवात झाली. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेली प्रक्रिया मार्गी लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ई-पिक पाहणी न झाल्यास संबंधित पिकांची अधिकृत नोंद शासनाच्या यंत्रणेकडे होण्यास अडचणी निर्माण होतात. परिणामी पीक विमा, नुकसानभरपाई, कृषी अनुदाने तसेच दुष्काळी मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता होती. मॅपिंगची अडचण दूर झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले
..............
KMW26A01210
खामसवाडी ः उसतोडणी पूर्णपणे बंद करीत उसाला पाच हजार रुपयांचा दर देण्याची मागणी करण्यात आली.
पाच हजार रुपये दरासाठी
खामसवाडीत ऊसतोड बंद
दर जाहीर करून शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी
खामसवाडी, ता. ८ (बातमीदार) : अपुऱ्या पावसामुळे यंदा उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता असताना साखर व गुळाचे दर वाढले आहेत. त्यामुळे उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर देण्याच्या मागणीसाठी खामसवाडी येथील ऊसतोडणी बंद करण्यात आली आहे. ऊसतोड बंद असल्याने खामसवाडी व मोहा येथील ऊस गाळप करणारे कारखानेही बंद पडले आहेत.
यंदा पावसाळ्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, कमी पावसामुळे सोयाबीनसह खरीप पिके करपून गेली आहेत. विहिरी व कूपनलिका कोरड्या पडू लागल्याने उसाच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे कारखान्याला ऊस गेल्यानंतर शेतकऱ्यांचे संपूर्ण क्षेत्र मोकळे होणार आहे. अशा परिस्थितीत उसापासून मिळणारे उत्पन्न हा शेतकऱ्यांसाठी आधार ठरणार आहे.
गूळ व साखरेचे दर वाढत असताना त्या प्रमाणात उसाला भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा उसाला प्रतिटन पहिली उचल चार हजार १०० रुपये व अंतिम दर पाच हजार रुपये द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दिलीप पाटील, दयानंद पाटील, अमोल पाटील, सतीश माने, चंद्रकांत पाटील, सचिन शेळके, शशिकांत पाटील, संदीप जाधव, अजित शेळके आदींनी सिद्धिविनायक, मोहेकर व एस. पी. शुगर कारखान्यांना निवेदन दिले. तसेच ५ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी मांडली. त्यानुसार ७ ऑक्टोबरला ऊस उत्पादक शेतकरी व कारखानदारांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत तोडगा निघणार की ऊसदर निश्चित होईपर्यंत ऊसतोड बंद राहणार, याकडे लक्ष लागले आहे.
.............
कळंब तहसील कार्यालयात
महावितरणचा माहिती स्टॉल
कळंब, ता. ८ (बातमीदार) : घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारून वीज निर्मिती करण्याची संधी, शासनाच्या विविध वीजविषयक योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया तसेच विद्युत सुरक्षेबाबत घ्यावयाची खबरदारी याची माहिती नागरिकांना देण्यासाठी तहसील कार्यालयात महावितरणच्या वतीने विशेष माहिती स्टॉल उभारण्यात आला. सेवा संकल्प अभियानांतर्गत ६ ऑक्टोबरला उभारलेल्या या स्टॉलला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.
या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजना, सोलर रूफटॉप योजना, स्मार्ट योजना यासह महावितरणच्या विविध सेवा व योजनांची माहिती देण्यात आली. तहसीलदार हेमंत ढोकले यांनी स्टॉलला भेट देऊन योजनांची माहिती जाणून घेतली. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जयंत लढे यांनी तहसीलदार ढोकले तसेच उपस्थित नागरिकांना विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. सौरऊर्जेचा वापर वाढवून पारंपरिक विजेवरील अवलंबित्व आणि वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
विद्युत सुरक्षेबाबतही जनजागृती
वीज उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी, विद्युत अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, घरगुती व सार्वजनिक ठिकाणी विजेचा सुरक्षित वापर याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. महावितरणचे भरत निंगुळे, सौरभ टाकरखडे तसेच येरमाळा येथील शंकर तम्माना यांनी नागरिकांना माहिती दिली.