''एफडीए'' कडून १३ लाख रुपये किमतीची हळद पावडर जप्त

''एफडीए'' कडून १३ लाख रुपये किमतीची हळद पावडर जप्त
Published on: 
‘एफडीए’तर्फे सेलूत १३ लाखांची हळद पावडर जप्त ---------------- अभिनव फूड प्रोडक्टचा परवाना निलंबित; अन्नपदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. २३ ः अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी (ता. २२) सेलू तालुक्यात एका पेढीमधून १३ लाख रुपये किमतीची हळद पावडर जप्त केली तर परभणी येथील एका बेकर्सचा परवाना निलंबित केला. जिल्हा अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सुरक्षित अन्न-निरोगी महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत विविध अन्नपदार्थांची निर्मिती करणाऱ्या पेढ्यांच्या तपासणीची मोहिम हाती घेतली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी (ता.२२) सेलू-वालूर रस्त्यावरील ब्राह्मणगाव (ता. सेलू) येथील मे. अभिनव फूड प्रोडक्ट या पेढीमध्ये खाद्यरंग वापरत असल्याच्या संशयावरून तपासणी केली. या ठिकाणी पथकास अनारोग्यकारक हाताळणी व अयोग्यरीत्या पॅकिंग करीत असल्याचे आढळल्यामुळे सुमारे चार हजार ३४८ किलो वजनाचा व १३ लाख चार हजार ४०० रुपये किमतीचा हळद पावडरचा साठा जप्त करण्यात आला. पेढीमध्ये अन्न सुरक्षा विषयक विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यामुळे या पेढीचा परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अन्नपदार्थाचे अधिकृत नमुने घेऊन ते तपासणीसाठी अन्न विश्लेषण प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यानुसार दोषी आढळल्यास संबंधित पेढीविरुद्‍ध न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शाखाली सहायक आयुक्त अनंत चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी ठोंबरे, मुळे यांच्या पथकाने केली. --------- के.के. बेकर्सचा परवाना निलंबित एफडीएच्या पथकाने शहरातील रहेमतनगर येथील मे. के.के. बेकर्स या बेकरीची देखील तपासणी केली. यावेळी अन्न सुरक्षा विषय विविध तरतुदींचे उल्लंघन, आस्थापनेने परवाना अद्ययावत केला नाही, अन्न हाताळणाऱ्या व्यक्ती/कामगारांनी ॲप्रन, हेडगियर घातले नव्हते, वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव होता. येथे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणारी प्रभावी यंत्रणा दिसून आली नाही, कीटक नियंत्रण, आस्थापनेत स्वच्छतेचा अभाव, उत्पादनात सर्वेक्षण व गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेचा अभाव, सुरक्षित अन्नपदार्थ तयार करण्यासाठी अपुरी व्यवस्था, कामगार वर्गाची वैयक्तिक स्वच्छता, प्रशिक्षणाचा अभाव, अयोग्य साठवणूक आदी बाबी आढळून आल्याने या पेढीचा परवाना तत्काल प्रभावाने निलंबित करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com