परभणी जिल्ह्यात भूजलसाठ्याला मोठा धक्का

परभणी जिल्ह्यात भूजलसाठ्याला मोठा धक्का
Published on: 
भूजलपातळी ४,२५ मीटरने खालावली ---------------------------- -जिल्ह्यात हिवाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे संकेत -सेलू तालुक्यात सर्वाधिक ७.७३ मीटरची घट -चार तालुक्यांत पाच मीटरपेक्षा अधिक घसरण ---------------------------------------- सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ८ ः गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील भूजलसाठ्याला काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने त्याचा थेट परिणाम भूगर्भातील साठ्यावर झाला आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने सप्टेंबरमध्ये केलेल्या पाहणीत जिल्ह्याची भूजलपातळी सरासरी ४.२६ मीटरने खालावल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः सेलू, पाथरी, जिंतूर आणि गंगाखेड या चार तालुक्यांतील पातळी पाच मीटरपेक्षा अधिक खोल गेली आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामासह हिवाळ्याच्या तोंडावरच पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ८६ निरीक्षण विहिरींची पाहणी केली. मागील पाच वर्षांतील (२०२१ ते २०२५) सप्टेंबर महिन्यातील पातळीची सरासरी ३.६० मीटर होती. यंदा हीच पातळी ७.८६ मीटरपर्यंत खाली गेली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा भूजलपातळीत सरासरी ४.२६ मीटरची घट झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकाही तालुक्यात भूजलपातळीत वाढ झाली नाही. सर्वच तालुक्यांतच पाणीपातळी खालावल्याचे निरीक्षणात आले आहे. सेलू तालुक्यात परिस्थिती सर्वाधिक गंभीर असून, येथे पाणीपातळी ७.७३ मीटरने खाली गेली आहे. सेलूनंतर पाथरीमध्ये ५.९५ मीटर, जिंतूरमध्ये ५.५३ मीटर आणि गंगाखेडमध्ये ५.०२ मीटरची घट नोंदविण्यात आली आहे. मानवत तालुक्यात भूजल पातळी ३.७० मीटरने, सोनपेठमध्ये ३.३३ मीटरने, पूर्णा तालुक्यात २.९८ मीटरने, तर पालममध्ये २.२९ मीटरने खालावली आहे. परभणी तालुक्यात तुलनेने कमी म्हणजे १.८२ मीटरची घट झाली असली, तरी येथील भूजलपातळी ७.२३ मीटरपर्यंत खाली गेली आहे. सप्टेंबर २०२६ मधील निरीक्षणानुसार सेलू तालुक्यात भूजलपातळी तब्बल १२.४६ मीटर खोलीवर पोचली आहे. मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत येथे ७.७३ मीटरची घट झाली आहे. पाथरीमध्ये पाणीपातळी ९.५० मीटर, जिंतूरमध्ये १२.४० मीटर आणि गंगाखेडमध्ये ९.५० मीटरच्या आसपास पोचल्याचे आकडेवारीतून दिसून येते. जिंतूर तालुक्यात सर्वाधिक २० निरीक्षण विहिरींची पाहणी करण्यात आली. या विहिरींच्या निरीक्षणातूनही भूजलसाठ्यात लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या भागातील पाणी उपलब्धतेबाबत आगामी काळात चिंता वाढण्याची शक्यता आहे. -- पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम यंदाच्या पावसाची अनियमितता, अपुरा पाऊस यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पुनर्भरणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे विहिरी, अन्य भूजलस्रोतांवरील अवलंबित्व असलेल्या भागांत पाणी उपलब्धतेचे आव्हान निर्माण होऊ शकते. रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढणार असून, उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसातील अनियमिततेमुळे भूगर्भातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे निरीक्षणातून दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काळात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, असे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. सी. डी. चव्हाण यांनी सांगितले. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com