उद्योगांसाठी जमीन शोधणे आता अधिक सुलभ
---
-देशभरातील २० औद्योगिक स्मार्ट शहरांची माहिती एका क्लिकवर
-जीआयएस मॅपिंगसह पायाभूत सुविधांची पडताळणी शक्य
-एनआयसीडीसीकडून ‘आयसीएलपी’ डिजिटल प्लॅटफॉर्म
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ५ : नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा अस्तित्वातील प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी योग्य औद्योगिक भूखंड शोधणे आता गुंतवणूकदारांसाठी अधिक सोपे झाले आहे. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाअंतर्गत (एनआयसीडीपी) विकसित होत असलेल्या देशभरातील २० औद्योगिक शहरांची सविस्तर माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ‘इंडस्ट्रियल कॉरिडॉर लँड प्लॅटफॉर्म’ (आयसीएलपी) सुरू करण्यात आला.
नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एनआयसीडीसी) विकसित केलेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे औद्योगिक भूखंडांचा शोध अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुलभ होणार आहे. गुंतवणूकदारांना योग्य जागेची निवड करताना येणाऱ्या अडचणींवर तोडगा म्हणून ‘आयसीएलपी’ प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे देशातील प्रमुख औद्योगिक शहरांमधील उपलब्ध जागा, रस्ते आणि वाहतूक कनेक्टिव्हिटी तसेच पायाभूत सुविधांची अद्ययावत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. यामुळे उद्योग जगताला गुंतवणुकीचे अचूक नियोजन करणे शक्य होणार आहे.
---
उद्योजकांसाठी अधिकृत संकेतस्थळ
नवीन उत्पादन प्रकल्प उभारू इच्छिणारे किंवा उद्योगांचा विस्तार करू पाहणारे उद्योजक iclp.nicdc.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन गरजेनुसार जमिनीचा शोध घेऊ शकतात. जमीन वाटपातील पारदर्शकता वाढवून देशात ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’ला (व्यवसाय सुलभता) गती देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
---
प्लॅटफॉर्मची प्रमुख वैशिष्ट्ये
१. जीआयएस-सक्षम नकाशे : भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस) विविध राज्यांमधील औद्योगिक वसाहती व भूखंडांचे प्रत्यक्ष स्थान डिजिटल नकाशावर पाहता येईल.
२. पायाभूत सुविधांची पडताळणी : संबंधित औद्योगिक क्षेत्रातील अखंड वीज, पाणी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) आणि इतर मूलभूत सुविधांची अचूक माहिती तपासता येईल.
३. लॉजिस्टिक्स व कनेक्टिव्हिटी : महामार्ग, रेल्वे नेटवर्क, बंदरे आणि विमानतळांपासूनचे अंतर व वाहतूक सुविधांचे विश्लेषण करणे सुलभ होईल.
४. औद्योगिक वसाहतींची तुलना : विविध राज्यांतील औद्योगिक शहरांची त्यांच्या उपलब्ध सोयींनुसार थेट तुलना करून योग्य जागेची निवड करता येईल.
५. पारदर्शक गुंतवणूक नियोजन : थेट पार्क पातळीवरील अधिकृत माहिती उपलब्ध असल्याने निर्णयप्रक्रिया जलद होईल.