पान १ लीड
----
रस्त्यावरून चालणं म्हणजे मृत्यूच्या दाढेतून वाट काढणं
जालना रोड ते बार्शी नाका रस्ता बनला पादचाऱ्यांसाठी डेथ ट्रॅप
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ८ ः पाठीमागून कधी एखादा ट्रक अंगावर येईल आणि समोरून येणारी रिक्षा कधी धडक देईल, याचा काहीच नेम नाही! मुलाला शाळेत सोडायला जाताना रोज जीव मुठीत धरून या रस्त्यावरून चालावं लागतं. इथे फूटपाथच नाही, मग आम्ही चालायचं कुठून? बीडच्या जालना रोडवरून रोज पायी प्रवास करणाऱ्या एका संतप्त माउलीचे हे बोलके शब्द आहेत. बीड शहरातील जालना रोड ते बार्शी नाका हा मुख्य रस्ता पादचाऱ्यांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावर पहिला हक्क पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांचा आहे, असा स्पष्ट आदेश दिलेला असताना, बीड शहरात मात्र या आदेशाची उघडपणे पायमल्ली होत आहे. शहराची मुख्य धमनी असलेल्या या मार्गावर पादचाऱ्यांसाठी पाच फूट जागाही मोकळी सोडलेली नाही. संपूर्ण रस्त्यावरून फूटपाथ नावाचा प्रकारच गायब झाला आहे. त्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णालयात जाणारे नागरिक थेट डांबरी रस्त्यावरून, सुसाट वाहनांच्या रांगेतून वाट काढत अत्यंत जीवघेणा प्रवास करत आहेत. एखादा पाय घसरला किंवा वेगाचा अंदाज चुकला तर गंभीर अपघात अटळ आहे.
जनतेच्या जिवाशी रोज खेळ सुरू असताना, लोकप्रतिनिधी आणि लाखोंचा पगार घेणारे प्रशासकीय अधिकारी मात्र आपल्या वातानुकूलित (एसी) गाड्यांच्या बंद काचांमधून सुसाट निघून जातात. त्यांना सामान्य पादचाऱ्यांच्या मरणयातना दिसत नाहीत, अशी संतप्त भावना बीडकरांमध्ये निर्माण झाली आहे. नगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अनास्थेमुळे आज हा मुख्य रस्ता अपघाताचे मोठे केंद्र बनला आहे.
-------
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उघड उल्लंघन
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यांवर फूटपाथ असणे अनिवार्य केले आहे आणि पहिला हक्क पायी चालणाऱ्यांचा असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, बीडमधील प्रशासकीय यंत्रणांनी या आदेशालाच केराची टोपली
दाखवली आहे. रस्ते रुंदीकरणात किंवा अतिक्रमणांमध्ये फूटपाथची जागा पूर्णपणे गिळंकृत झाली आहे.
---------
रोजचा जीवघेणा संघर्ष
जालना रोड ते बार्शी नाका या मार्गावर पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र, सुसाट दुचाकी, बेदरकार रिक्षा आणि अवजड वाहने अगदी पादचाऱ्यांच्या अंगाला घासून जातात. क्षणाक्षणाला अपघात होण्याची भीती येथे कायम असते.
--------
प्रशासनाला थेट आंदोलनाचा इशारा
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासणाऱ्या आणि नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात बीडकरांमध्ये प्रचंड संताप आहे. जालना रोड ते बार्शी नाका या संपूर्ण मार्गावर तत्काळ सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त फूटपाथ तयार करण्यात यावा, अन्यथा बीडमधील नागरिक रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारतील, असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी दिला आहे.
-----
फोटो कॅप्शन
बीड : जालना रोड ते बार्शी नाका रस्त्यावर फूटपाथ नसल्यामुळे थेट डांबरी रस्त्यावरून जीव मुठीत धरून पायी चालणारे नागरिक अन् त्यांच्या अगदी जवळून सुसाट वेगाने धावणारी धोकादायक वाहने. (छायाचित्र ः कृष्णा शिंदे)