ABD26J82002
(((फोटो कॅप्शन))) उस्मानपुरा : एक्सेल सोलर पॉवरचे योगेश राजपूत, कलावंत वंदना गुप्ते, संकर्षण कऱ्हाडे, शांती नर्सिंग होमचे (ॲडमिन) दीपक फसाटे, एक्सेल सोलरचे विशाल पाटील. (ABD26J82003) ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकातील प्रसंग. (ABD26J82004) रसिकांची झालेली गर्दी.
---
‘कुटुंब किर्रतन’मधून उलगडले नात्यांचे गोड-तिखट सूर
----
‘सकाळ’ नाट्य महोत्सवात विनोदी प्रसंगांनी हशा, तर भावनिक क्षणांनी डोळ्यांत पाणी
---
उस्मानपुरा, ता. २३ : विठ्ठलनामाच्या गजरात सुरू झालेल्या ‘कुटुंब किर्रतन’ नाटकात कधी आई-मुलाच्या नात्यातील संस्कार उलगडले, तर कधी लेकीवरील वडिलांच्या मायेने डोळ्यांच्या कडा ओलावल्या. लग्नानिमित्त जुळणारी नाती, विचारांमधील मतभेद आणि विनोदी संवादांतून रंगणाऱ्या प्रसंगांनी रसिकांना हसवले. काही क्षणांनी भावुक केले. प्रेम, आपुलकी आणि कुटुंबातील गोड-तिखट नात्यांचा हळवा पट या नाटकातून उलगडला.
‘सकाळ’ नाट्य महोत्सवाच्या पहिल्या दिवशी संत एकनाथ रंगमंदिरात शुक्रवारी (ता. २३) हे नाटक सादर झाले.
नाटकात पुंडलिक आणि शिवानी यांच्या कांदेपोहे/बघण्याच्या कार्यक्रमादरम्यान पुंडलिकची आई आणि शिवानीचे वडील यांच्यातील विनोदी संवादांनी सभागृहात एकच हशा पिकवला. कुटुंबीयांचा सन्मान, आईची काळजी आणि लग्नानंतरच्या आयुष्याबाबतच्या अपेक्षा यातून नात्यांमधील घट्ट भावबंध समोर आले. मात्र, त्याच वेळी पुंडलिक आणि शिवानी यांच्या विचारांतील विसंवादही स्पष्ट झाला, तरीही पुंडलिकने शिवानी आपल्याला पसंत असल्याचे सांगितले. संकर्षण कऱ्हाडे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लग्नातील दिखावा आणि अनावश्यक खर्चावर मिश्कील भाष्य केले. एका दिवसाच्या सोहळ्यापेक्षा आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे आणि माहेरच्या माणसांनी दिलेल्या पैठणीच्या आठवणींतून प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक आधाराचा हळवा पदर त्यांनी उलगडून दाखवला. या नाटकात शिवानी आणि तिच्या वडिलांमधील प्रेमाचा क्षण मनाला अत्यंत भिडणारा होता. वडिलांनी दिलेली भेटवस्तू, लेकीला मारलेली प्रेमाची मिठी आणि डोळ्यांत दाटलेले अश्रू यांनी संपूर्ण वातावरण भावुक केले.
‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाचे लेखन कऱ्हाडे यांनी केले. अमेय दक्षिणदास यांचे दिग्दर्शन आहे. गौरी थिएटर्स (प्रशांत दामले फॅन फाउंडेशन) यांची निर्मिती असलेल्या या नाटकात संकर्षण कऱ्हाडे (पुंडलिक), वंदना गुप्ते (वत्सलाबाई - आई), नूपुर चितळे (शिवानी) आणि अमोल कुलकर्णी (शिवानीचे वडील) यांनी आपल्या कसलेल्या अभिनयाने रंग भरले.
हा नाट्य महोत्सव एक्सेल सोलार पॉवर प्रस्तुत असून, शांती नर्सिंग होमचे को-स्पॉन्सर्स म्हणून विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संतोष शाळिग्राम आणि युनिट हेड संजय चिकटे यांनी योगेश राजपूत, दीपक फसाटे, विशाल पाटील, कलावंत संकर्षण कऱ्हाडे, वंदना गुप्ते आणि चित्रपट दिग्दर्शक महेश लिमये यांचे स्वागत केले. या कलाकृतीला रसिकांनी उदंंड प्रतिसाद दिला.
---
आज ‘वरवरचे वधू-वर’
महोत्सवात शनिवारी (ता. २४) रात्री साडेआठ वाजता संत एकनाथ रंगमंदिर येथे ‘वरवरचे वधू-वर’ हे नाटक सादर होणार आहे. कार्यक्रमस्थळी तिकीट विक्री सुरू आहे.