LTR26B15154
लातूर ः शहरात सार्वजनिक विंधन विहिरीचे सर्वेक्षण करताना महापालिकेचे कर्मचारी.
बोअर दारात, नळ घरात!
--
महापालिकेच्या सार्वजनिक विंधन विहिरींवर अनेकांच्या अनधिकृत जोडण्या
हरी तुगावकर ः सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ५ ः शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, या उद्देशाने लातूर महापालिकेने शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक विंधन विहिरी (बोअरवेल) उभारल्या आहेत. मात्र, याच सार्वजनिक बोअरवेलवर काही ठिकाणी अनधिकृत नळ जोडण्यांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे, काही विंधन विहिरी आजी-माजी नगरसेवकांच्या दारात असून, तेथून नळ जोडणी थेट घरात गेल्याचेही चित्र आहे. त्यामुळे सार्वजनिक पाण्याचा खासगी वापर कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
विंधन विहिरी मोजक्या घरापुरत्या
लातूर शहरात महापालिकेच्या सुमारे बाराशे विंधन विहिरी आहेत. शहरातील अनेक भागांत या विंधन विहिरींचा उपयोग नागरिकांना पिण्याचे पाणी तसेच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी केला जातो. मात्र, सार्वजनिक मालमत्ता असलेल्या या विंधन विहिरी काही नागरिकांनी परस्पर नळ जोडण्या घेतल्याने महापालिकेच्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतकेच नव्हे, तर काही आजी-माजी नगरसेवकांच्या दारातच या सार्वजनिक विंधन विहिरी आहेत. तेथून सरळ घरात जोडण्या घेतल्या आहेत. नांदेड रोड भागात हा प्रकार अधिक आहे. सार्वजनिक विंधन विहिरीचा पाणीपुरवठा काही मोजक्या घरांपुरता मर्यादित होत असेल, तर इतर नागरिकांनी पाणी कुठून घ्यायचे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
मनपाची १९ पथके नियुक्त
दरम्यान, महापालिकेने शहरातील विंधन विहिरीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणासाठी तब्बल १९ पथके नियुक्त केली आहेत. प्रत्येक विंधन विहिरीची पाहणी करून तिची स्थिती, वापर, पाणीपुरवठ्याची व्यवस्था तसेच अस्तित्वात असलेल्या नळ जोडण्यांची माहिती संकलित केली जात आहे. या सर्वेक्षणातून सार्वजनिक बोअरवर असलेल्या अनधिकृत जोडण्या समोर येण्याची शक्यता आहे.
महापालिका हिम्मत दाखवणार?
विंधन विहिरींचे केवळ सर्वेक्षण करून महापालिका थांबणार की प्रत्यक्ष कारवाईही करणार, हा खरा प्रश्न आहे. अनधिकृत नळ जोडण्या आढळल्यानंतर त्या तोडण्याची हिंमत प्रशासन दाखवणार का, याकडे लक्ष लागले आहे. नियम सर्वांसाठी समान असतील, तर आजी-माजी नगरसेवक असोत किंवा सामान्य नागरिक, सार्वजनिक विंधन विहिरीवरून घेतलेल्या अनधिकृत नळ जोडण्या तोडण्याची गरज आहे. तरच इतर नागरिकांनादेखील पाणी उपलब्ध होणार आहे. शहरात पाणीटंचाई जाणवत असताना सार्वजनिक पाणीस्रोतांवर होणारा अनधिकृत वापर रोखणे, ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे १९ पथकांच्या सर्वेक्षणानंतर किती अनधिकृत जोडण्या आढळतात आणि त्यापैकी किती जोडण्या प्रत्यक्ष तोडल्या जातात, याकडे लक्ष लागले आहे.
----------