पदवीधरसाठी जिल्ह्यात ७६ मतदान केंद्रे
------
प्रारूप यादीबाबत राजकीय पक्षांकडून हरकती, सूचना मागविल्या
------
धाराशिव, ता. ५ ः महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ७६ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांच्या प्रारूप यादीबाबत राजकीय पक्षांच्या प्रमुख व प्रतिनिधींकडून हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत.
भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबरच्या या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रस्तावित मतदान केंद्रांची माहिती देण्यासाठी सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नायब तहसीलदार (निवडणूक) आणि विविध राजकीय पक्षांचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
----
तालुकानिहाय प्रस्तावित मतदान केंद्रे
धाराशिव : १६
उमरगा : १२
तुळजापूर : ११
कळंब : १०
भूम : ८
परंडा : ८
लोहारा : ६
वाशी : ५
-----
अंतिम यादी लवकरच होणार प्रसिद्ध
बैठकीत मतदान केंद्रांच्या प्रारूप यादीवर विस्तृत चर्चा करण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून ही प्रारूप यादी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अंतिम मान्यतेनंतर मतदान केंद्रांची निश्चित यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती पुजार यांनी दिली.