विधी अभ्यासक्रमासाठी संस्थात्मक फेरीला मुदतवाढ
छत्रपती संभाजीनगर, ता. ८ : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतील संस्थात्मक फेरीला शनिवारपर्यंत (ता. दहा) मुदतवाढ देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच प्रवेश अर्जात गुण अथवा अन्य तपशील चुकीचे नमूद झालेल्या विद्यार्थ्यांना दुरुस्तीची संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील १६७ पाच वर्षांच्या विधी महाविद्यालयांमध्ये १३ हजार ४१८ जागा आहेत. त्यापैकी आतापर्यंत ११ हजार २१५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, २ हजार २०३ जागा रिक्त आहेत. प्रवेशासाठी १८ हजार ७७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पहिल्या फेरीत २ हजार ६८६, दुसऱ्या फेरीत १ हजार ४७४ आणि तिसऱ्या फेरीत ३ हजार ४२९, असे एकूण ७ हजार ५८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर ५ ऑक्टोबरपर्यंत झालेल्या संस्थात्मक फेरीत ३ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे आतापर्यंत ११ हजार २१५ म्हणजेच ८३.५८ टक्के जागांवर प्रवेश झाले आहेत. मुदतवाढीनुसार शुक्रवारी (ता. नऊ) महाविद्यालयांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर ९ व १० ऑक्टोबरला संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रे सादर करून शुल्क भरत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.