कागदपत्र पडताळणीतून बाद
ठरवलेल्या दोघांना दिलासा
पडताळणी करून निकाल सीलबंद लखोट्यात ठेवण्याचे अंतरिम आदेश
छत्रपती संभाजीनगर, ता. २३ : वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेतील ‘प्रलेखकार अथवा ग्रंथसूचीकार’ पदाच्या कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत अपात्र ठरवलेल्या दोन उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आणि निकाल सीलबंद लखोट्यात ठेवण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. न्यायालयाच्या या आदेशानंतर वैद्यकीय शिक्षण आयुक्तालयाने तातडीने संबंधित उमेदवारांना पडताळणीसाठी पाचारण केले आहे. या दोन उमेदवारांचे अर्ज महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) फेटाळल्यानंतर त्यांनी खंडपीठात धाव घेतली होती.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने शासकीय वैद्यकीय, दंत महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमधील गट-क संवर्गातील १,१०७ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये प्रलेखकार/ग्रंथसूचीकार पदाच्या ३६ जागांचा समावेश होता. यवतमाळ येथील प्रज्वल भोयर आणि नांदेड येथील महेंद्र मथमवार यांनी या पदासाठी अर्ज भरला होता. जानेवारी २०२६ मध्ये गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर निवडक उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले. या पहिल्या फेरीत अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना विभागाने पुन्हा संधी दिली होती. मात्र, जवळपास चार महिन्यांच्या अंतरानंतर ४ जुलैला विभागाने संकेतस्थळावर नवीन यादी प्रसिद्ध केली, ज्यामध्ये या दोन्ही याचिकाकर्त्यांचा समावेश होता. याचिकाकर्त्यांना ई-मेल किंवा एसएमएसद्वारे कोणतीही थेट सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांना या पडताळणीची वेळेत माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत याचिकाकर्त्यांसमोर ‘अनुपस्थित’ असा शेरा मारून त्यांना अपात्र ठरवण्यात आले.
विभागाने पुन्हा १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान इतर पदांसाठी पडताळणीचे सत्र ठेवले होते. याचिकाकर्त्यांनी या फेरीत स्वतःची कागदपत्र पडताळणी करून घेण्याची विनंती करत महाराष्ट्र मॅटच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अर्ज दाखल केला होता; परंतु, मॅटच्या खंडपीठाचे न्यायिक सदस्य न्या. व्ही. के. जाधव आणि प्रशासकीय सदस्य विनय कारगावकर यांनी हा अर्ज फेटाळला. भोयर आणि मथमवार यांनी ॲड. अविनाश खेडकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. नितीन बी. सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस जारी केली. शिवाय याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून याचिकाकर्त्यांची कागदपत्र पडताळणी पूर्ण करावी आणि त्यांचा निकाल स्वतंत्रपणे सीलबंद पाकिटात ठेवावा, असा अंतरिम आदेश दिला. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्तालयाने तत्काळ याचिकाकर्त्यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. त्यानुसार प्रज्वल भोयर व महेंद्र मथमवार यांना मुंबई येथील आयुक्तालयात आवश्यक त्या सर्व मूळ कागदपत्रांसह हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.