लातूर : श्री जय जगदंबा मंदिर.
जय अंबिका मंदिर.
श्री कालिका देवी मंदिर.
श्री महालक्ष्मी मंदिर.
----
लातुरात उद्यापासून आदिशक्तीचा जागर
----------
देवीच्या मंदिरांमध्ये जय्यत तयारी; बाजारपेठेतही लगबग; दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी उचलली पावले
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ९ : आश्विन शुद्ध प्रतिपदेनुसार रविवारपासून (ता. ११) शारदीय नवरात्र उत्सवाला सुरवात होत आहे. घटस्थापनेपासून या मंगलपर्वाचा प्रारंभ होणार असून शहरातील विविध मंदिरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये या उत्सवाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील बाजारपेठेतही ‘आदिशक्ती’च्या स्वागताची लगबग पहायला मिळत आहे. यंदा दुष्काळाची परिस्थिती असल्याने शहरातील काही देवस्थानांनी उत्सव साधेपणाने करीत राज्य सरकारकडे दुष्काळनिधी सुपूर्द करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवानंतर प्रत्येकाचे लक्ष लागलेले असते ते नवरात्र उत्सवाकडे! घटस्थापनेने नवरात्रोत्सवाची सुरवात होते. त्यामुळे अनेक घरात घटस्थापनेची तयारी सुरू झाली आहे. शहरातील देवीच्या मंदिरातही घटस्थापनेचे नियोजन सुरू आहे. मंदिरासमोर मंडप उभा करणे, मंदिराचा परिसर फुलांच्या आणि विद्यूत रोषणाईच्या माळांनी सजविणे, मंदिरावर रंगरंगोटी करणे अशी विविध कामे मंदिरात सुरू आहेत. शहरातील अनेक मंडळांनीही नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. जागोजागी मंडप, मंदिराच्या प्रतिकृती उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. घटस्थापनेचा दिवस जवळ आल्याने बाजारातही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. परडी, काळी माती, पूजेचे वस्त्र, बांगड्या, फळे अशा वस्तू आवर्जून खरेदी केल्या जात आहेत.
---
श्री जय जगदंबा मंदिर : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंजगोलाईतील श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाने नेहमीप्रमाणेच यंदाही उत्सवाची जय्यत तयारी केली असून यंदा रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उत्सवमूर्तीची मिरवणूक निघणार आहे. विविध पारंपारिक वाद्यांच्या निनादात गंजगोलाईला पाच प्रदक्षिणा घातल्या जाणार आहेत. त्यानंतर मंदिरात उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर बिडवे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तर धर्मादाय सह आयुक्त विद्याधर मोरे यांच्या हस्ते रात्री आठ वाजता महापूजा केली जाणार आहे.
---
जय अंबिका मंदिर : गांधी मार्केट भागातील श्री अंबिका मंदिरातही दरवर्षी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे येथेही नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. येथील मंदिरात रविवारी सकाळी ११ वाजून ३३ मिनिटांनी घटस्थापनेचा सोहळा होणार आहे. उद्योजक प्रवीण ब्रिजवासी यांच्या हस्ते घटस्थापना होईल. उत्सवात दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. पण, यंदा दुष्काळ, पाण्याची टंचाई, शेतकऱ्यांसमोरील संकट याचा विचार करून सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांसाठी खर्च होणारी रक्कम दुष्काळनिधी म्हणून राज्य सरकारकडे सुपूर्द केली जाणार आहे. त्यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना देवस्थानाने निमंत्रित केले आहे. १ लाख ११ हजार १११ रुपयांचा निधी त्यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अमर कोकाटे यांनी दिली.
---
श्री कालिका देवी मंदिर : जुना औसा रस्ता भागातील श्री कालिका देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची मोठी लगबग सुरू आहे. मंदिरात रविवारी सकाळी सात वाजता पंचामृत अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी नऊ वाजता पारंपारिक पद्धतीने कालिकादेवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दीपक दीक्षित यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात येईल. घटस्थापनेनंतर देवीची आरती होणार आहे. सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळेत कुंकुमार्चन आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत श्री पांडुरंग महिला भजनी मंडळ भजन सादर करणार आहे तर रात्री नऊ वाजता महाआरती होईल.
---
श्री महालक्ष्मी मंदिर : गांधी चौकातील श्री महालक्ष्मी मंदिरात यंदाही पारंपारिक वाद्यांच्या निनादात घटस्थापना करण्यात येणार आहे. मंदिरात रविवारी सकाळी ६ ते ८ या वेळेत अभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर लगेचच आरती होणार असून मंदिराचे अध्यक्ष राजकुमार लिंबाजी झिपरे यांच्या हस्ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घटस्थापना होईल. ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या हस्ते रात्री नऊ वाजता महाआरती होणार आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
---