जिल्ह्यातील ८३३ गावांची पैसेवारी ३५.१६ पैसे

जिल्ह्यातील ८३३ गावांची पैसेवारी ३५.१६ पैसे
Published on: 
जिल्ह्यातील ८३३ गावांची पैसेवारी ३५.१६ पैसे सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ६ ः पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या आशा मावळल्या आहेत. जिल्ह्यातील ८३३ गावांची नजरअंदाज पैसेवारी ३५.१६ पैसे जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे, एकाही तालुक्याची पैसेवारी ४० पैशांवर पोचलेली नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी केलेला खर्च तरी निघणार का, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पावसाच्या खंडामुळे ऐन वाढीच्या काळात जमिनीतील ओलावा कमी झाला. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध पिकांची वाढ खुंटली असून, अनेक भागांत पिके करपली आहेत. जिल्ह्यातील ५ लाख ८० हजार १११.५४ हेक्टर लागवडीलायक क्षेत्रापैकी ५ लाख ५६ हजार ७५८.८८ हेक्टरवर पेरणी झाली. मात्र, २३ हजार ३५१.८० हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडीक राहिले आहे. तालुकानिहाय पाहता मानवतची पैसेवारी सर्वांत कमी ३१.३० पैसे आहे. त्यानंतर सोनपेठ ३३, गंगाखेड ३४.४५, पूर्णा ३५, जिंतूर ३५.१५, पालम ३६, सेलू ३६ आणि पाथरी ३७.०१ पैसे अशी पैसेवारी आहे. पेरणीविना राहिलेल्या क्षेत्रात गंगाखेड तालुका आघाडीवर असून तेथे ४ हजार ८४३ हेक्टर क्षेत्र पडीक आहे. खरीप उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने रब्बी हंगामासाठी बियाणे, खते, मशागत आणि सिंचनाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कर्जाचे हप्ते, घरखर्च आणि पशुधनाच्या चारा-पाण्याचीही चिंता आहे. सध्या जाहीर झालेली पैसेवारी नजरअंदाज असून पीक कापणी प्रयोगानंतर अंतिम पैसेवारीत नुकसानीचे अधिक स्पष्ट चित्र समोर येणार आहे. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com