

छत्रपती संभाजीनगर : घाटकोपर येथे जाहिरात फलक कोसळण्याची घटना घडलेली आहे. मॉन्सून पूर्व कालावधीत व अन्य कालावधीत होणाऱ्या दुर्घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी शहरी भागातील व महामार्गावरील लावलेल्या जाहिरात फलकांची रचनात्मक तपासणी करावी. अवैध जाहिरात फलकाबाबत कठोर कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी सोमवारी दिले.
छत्रपती संभाजीनगर विभाग मॉन्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक मधुकर राजे अर्दड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. ‘यंदा मॉन्सूनचे लवकर आगमन होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यावेळी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित, वित्तीय हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी’, असेही ते म्हणाले.
यावेळी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत, लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, कर्नल ऋषिकेश सूर्यवंशी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, उपायुक्त जगदीश मिनीयार, नयना बोंदार्डे, सुरेश बेदमुथा, ॲलिस पोरे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील आदी उपस्थित होते. महानगरातील मोठे नाले, नदी यावरील लोखंडी मार्गांची तपासणी करावी, महानगरातील नाल्यांची सफाई कामे तातडीने पूर्ण करावी. जीर्ण इमारती, पुलांचे सर्वेक्षण करावे, ज्या भागात पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, तेथील नागरिकांचे स्थलांतराची पूर्वतयारी सज्ज ठेवावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.
साधनांची जय्यत तयारी
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांची मोटर बोट, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाइट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारीबाबत जिल्हानिहाय जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांनी बैठकीत माहिती दिली.
आयुक्तांचे निर्देश
पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो. अशा वेळी नागरिकांची निवास, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधसाठा आदी सामग्रीबाबत नियोजन करावे. नागरिकांच्या स्थलांतराची पूर्वतयारी ठेवावी.
साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी आरोग्य यंत्रणेच्या मदतीने नागरिकांची काळजी घ्यावी. अवकाळीनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने तत्परतेने नियोजन करावे.
जिल्हा व तालुकास्तरावर असलेला नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यान्वित ठेवावा. आपत्ती काळात त्वरित संपर्क करण्यासाठी प्रत्येक विभागांचे आणि संपर्क यंत्रणांचे संपर्क क्रमांक कायम सक्रिय ठेवावे.
एसडीआरएफ, एनडीआरएफची बचाव पथके स्थापन करून आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवावे. वीज अटकाव यंत्र तत्काळ दुरुस्त करून घेण्यासोबतच जिल्हानिहाय या यंत्रणेत प्रत्येक वर्षी शंभरने वाढ करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.