हिंगोली टुडे १ लीड ः नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी...

हिंगोली टुडे १ लीड ः  नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी...
Published on: 
ABD26J82022 नर्सी : संत शिरोमणी नामदेव महाराजांचे दर्शन घेताना आळंदी येथील संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील, संत साहित्य अभ्यासक प्रा.डाॅ. विठ्ठल जायभाये, प्रा.डाॅ. मुरलीधर जायभाये यांच्यासह वारकरी. ------ ABD26J82023 नर्सी : संत चोखामेळा साहित्य संमेलनात उद्‍घाटक म्हणून मार्गदर्शन करताना संत साहित्य अभ्यासक इंद्रजित देशमुख. व्यासपीठावर प्रा.डाॅ. विठ्ठल जायभाये, मनोज आखरे, डाॅ. रमेश शिंदे, भिकाजी कीर्तनकार, द्वारकादास सारडा, सतीश विडोळकर आदी. ------ संतविचारांसोबत सामाजिक बांधिलकीचा आदर्श ---- ‘नाचू कीर्तनाचे रंगी’च्या जयघोषात नर्सीत संत चोखामेळा साहित्य संमेलन सुरू --- हिंगोली, ता. २४ (बातमीदार) : ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी...’ या संतशिरोमणी नामदेव महाराजांच्या अमर ओवीतून ज्ञानप्रसार आणि समतेचा संदेश देत, संत नामदेवांची पावन जन्मभूमी असलेल्या नर्सी येथे शनिवार (ता. २४) पासून तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाला भक्तिमय व उत्साही वातावरणात सुरवात झाली. संशोधन, प्रसार आणि प्रत्यक्ष समाजसेवा या त्रिसूत्रीवर हे संमेलन आधारलेले आहे, असे आयोजकांनी सांगितले. टाळ-मृदंगांचा नाद, विठूनामाचा गजर आणि संतांच्या अभंगवाणीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून, परिसरातील भाविक, साहित्यप्रेमी आणि विचारवंतांनी या सोहळ्याला मोठी गर्दी केली आहे. आळंदी येथील संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे येथील श्री संत चोखामेळा विचार व कृती संवर्धन फाउंडेशन आणि श्री संत नामदेव महाराज संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने या दोनदिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्‍घाटन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांतील विचारवंतांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने पार पडले. उद्‍घाटनापूर्वी सकाळी संत नामदेव महाराज मंदिरापासून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील वारकरी विद्यार्थी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि हातात टाळ-मृदंग घेतलेले तरुण या दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिंडीदरम्यान वारकरी विद्यार्थ्यांनी सादर केलेले गोल रिंगण आणि पारंपरिक कसरतींनी उपस्थितांची मने जिंकली. दिंडीच्या माध्यमातून संत चोखामेळा, संत नामदेव यांच्यासह संतांच्या विविध दुर्मिळ ग्रंथांचे दर्शन घडविण्यात आले. ‘ज्ञानदीप लावू जगी’ या ब्रीदवाक्यानुसार संतसाहित्यातील लोकजागृतीचा विचार घराघरांत पोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. ---- वर्गणीविना संमेलनाचा आदर्श साहित्य संमेलने म्हणजे लाखो-कोट्यवधींचा खर्च आणि स्थानिक नागरिकांवर पडणारा वर्गणीचा भार अशी सर्वसाधारण धारणा असते. मात्र, संत चोखामेळा साहित्य संमेलनाने याला फाटा दिला आहे. स्थानिक नागरिकांवर किंवा व्यापाऱ्यांवर कोणताही आर्थिक ताण न टाकता आणि कोणतीही सार्वजनिक वर्गणी गोळा न करता, अत्यंत साधेपणाने आणि वैचारिक गांभीर्याने हे संमेलन पार पाडण्याचा स्तुत्य पायंडा आयोजकांनी पाडला आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी परिसंवाद, भजन आणि संतांच्या जीवनकार्यावरील चर्चासत्रांना अभ्यासक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ---- समतेसह श्रमप्रतिष्ठेचा नवा जागर संत नामदेव आणि संत चोखामेळा यांच्यातील अद्वैताचा आणि जिव्हाळ्याचा अनुबंध सर्वश्रुत आहे. त्यामुळे संत नामदेवांच्या कर्मभूमीत हे संमेलन भरण्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. केवळ संत चोखामेळाच नव्हे, तर संत सोयराबाई, संत कर्ममेळा, संत बंका आणि संत निर्मळा या संपूर्ण संतकवितेतील भक्ती, श्रमप्रतिष्ठा आणि समतेचा क्रांतिकारी विचार नव्या पिढीपर्यंत पोचविणे, हा या संमेलनाचा मुख्य हेतू आहे. ---- चौकट दोन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व संतविचार केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक सेवेची जोड देण्यात आली आहे. या संमेलनाचे औचित्य साधून फाउंडेशनच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तसेच एकल पालकांच्या आधारावर जगणाऱ्या दोन गरजू विद्यार्थ्यांच्या संपूर्ण पदवीपर्यंतच्या शिक्षण खर्चाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. संमेलनाच्या व्यासपीठावरून या विद्यार्थ्यांना चालू वर्षाच्या शैक्षणिक मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात येत असून, संतांची खरी शिकवण प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणारा हा उपक्रम ठरला आहे. ----- चौकट आज ‘सार्थ अभंगगाथा’ ग्रंथाचे प्रकाशन संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी (ता. २५) सकाळी वैचारिक परिसंवाद, ज्येष्ठ वारकऱ्यांचा जाहीर सत्कार आणि दुपारच्या सत्रात नामवंत कीर्तनकारांचे प्रबोधनात्मक कीर्तन रंगणार आहे. याशिवाय, संतसाहित्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या ‘संत चोखामेळा आणि परिवार : सार्थ अभंगगाथा’ या विशेष संशोधनपर ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी व साहित्यप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com