((चार मेन))
.................
दहिफळला गुंठाभरात निघाले
अवघे १.५५ किलो सोयाबीन
एकरी ६२ किलोच उत्पादन, पीक कापणी प्रयोगातून नुकसानीची भीषणता स्पष्ट
राहुल थोरवे
दहिफळ, ता. ८ : चालू खरीप हंगामात अल्प पाऊस आणि हवामानाच्या लहरीपणामुळे पडलेल्या दुष्काळाची भीषण दाहकता आता प्रत्यक्ष शेतातून समोर येत आहे. दहिफळ (ता. कळंब) येथे एनडीआरएफच्या निकषानुसार घेण्यात आलेल्या सोयाबीन पीक कापणी प्रयोगात अवघ्या १ गुंठा (१० मीटर × १० मीटर) क्षेत्रातून केवळ १ किलो ५५० ग्रॅम (१.५५० किलो) एवढेच उत्पादन हाती आले आहे. म्हणजेच एकरी ६२ किलो उत्पादन शेतकऱ्याच्या हाती येत असल्याची स्थिती आहे. या नगण्य उत्पादनावरून यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांचे किती मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, याचे वास्तववादी चित्र स्पष्ट झाले आहे.
कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एनडीआरएफच्या अधिकृत नियमानुसार १ गुंठा प्रातिनिधिक क्षेत्रातील सोयाबीनची कापणी आणि मळणी करून उत्पादनाची नोंद घेतली. एरवी याच क्षेत्रातून निघणाऱ्या उत्पादनाच्या तुलनेत यंदा हाती आलेले उत्पादन अत्यंत निराशाजनक असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या पीक कापणी प्रयोगाप्रसंगी एआयसीचे विभागीय समन्वयक बाबासाहेब इनकर, जिल्हा समन्वयक अमोल मुळे, तालुका समन्वयक सार्थक नवले, कृषी विस्तार अधिकारी के. डी. निंबाळकर, सहाय्यक कृषी अधिकारी बी. डी. खाडे , ग्रामपंचायत अधिकारी एस.ए. मडके, ग्राम महसूल अधिकारी ए.बी. पवार, श्रीपती मते यांच्यासह स्थानिक शेतकरी वैजिनाथ भातलवंडे उपस्थित होते.
..........
((चौकट))
दुष्काळी मदतीसाठी नोंदी महत्त्वाच्या
पीक कापणी प्रयोगातून समोर येणाऱ्या या तुटपुंज्या उत्पादनाच्या आकडेवारीवरूनच सरासरी उत्पादन तूट निश्चित केली जाते. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी शासकीय मदत, पीकविमा भरपाई आणि विविध योजनांचे लाभ मिळण्याच्या दृष्टीने १ गुंठ्यातून हाती आलेल्या या १.५५० किलो उत्पादनाची अधिकृत नोंद महत्त्वाची ठरणार आहे.
.......
दहिफळ ः सोयाबीन पीक कापणी प्रयोगात अवघ्या १ गुंठा क्षेत्रातून केवळ १ किलो ५५० ग्रॅम एवढेच उत्पादन हाती आले. यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकारी, शेतकरी.
....
फोटो क्रमांक ःOSM26B07147