ऊसतोडणी सुरू; दराची कोंडी कायम
-
उताऱ्यात घटीची भीती ः कारखान्यांकडून ‘एफआरपी’ जाहीर होणे बाकी
गंगापूर, ता. २३ (बातमीदार) : तालुक्यातील गोदावरी पट्ट्यासह संपूर्ण परिसरात यंदाच्या गळीत हंगामाला आणि ऊसतोडणीला जोमाने सुरवात झाली आहे. मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातून ऊसतोड मजुरांच्या टोळ्या गाड्या-बैलांसह दाखल झाल्या आहेत. मात्र, गळीत हंगाम सुरू होऊनही साखर कारखान्यांनी उसाचा अधिकृत दर जाहीर न केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीसह चिंतेचे वातावरण पसरले आहे.
यंदा रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांना मशागतीपासूनच मोठा आर्थिक भार सहन करावा लागला आहे. त्यातच तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून उसाची वाढ खुंटली आहे. परिणामी, उसाच्या उताऱ्यात (रिकव्हरी) मोठी घट येण्याचा अंदाज आहे. तालुक्यात यंदा गाळपासाठी उपलब्ध असलेले उसाचे क्षेत्र ११ हजार ३३३ हेक्टर असून, नवीन लागवड ४ हजार ५५३ हेक्टरवर झाली आहे. दुष्काळ आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी उसाला मिळणाऱ्या चांगल्या भावावर आशा लावून बसला आहे.
चौकट
‘उसाला अखेर काय भाव मिळणार?’
नियम आणि शासन निर्णयानुसार गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी कारखान्यांनी रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र, तालुक्यातील धामोरी येथील मुक्तेश्वर शुगर, जामगाव येथील जयहिंद शुगर आणि महालगाव येथील पंचगंगा शुगर यांसह बाहेरून आलेल्या कोळपेवाडी, प्रवरा, भेंडा, वांबोरी, कन्नड, सोनई, संगमनेर, बारामती अॅग्रो व गणेशनगर आदी कारखान्यांच्या टोळ्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा न करता तोडणी सुरू केली आहे. त्यामुळे ‘उसाला अखेर काय भाव मिळणार?’ असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. याविषयी मुक्तेश्वर आणि पंचगंगा शुगर प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
-----------
प्रतिक्रिया
कारखान्यांनी दर जाहीर न करताच उसावर दरोडा घालण्याचे काम सुरू केले आहे. पुढील तीन ते चार दिवसांत दर जाहीर न झाल्यास रस्त्यावर आणि कारखान्यांच्या गव्हाणीत उतरून तीव्र आंदोलन केले जाईल.
- कृष्णा साबळे,
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
---------
प्रतिक्रिया
यंदा दुष्काळामुळे कारखाने महिनाभर अगोदर सुरू झाले, मात्र दर निश्चित नाही. कारखान्यांनी तत्काळ दर जाहीर करून नियमानुसार १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत.
- वाल्मीक शिरसाठ,
शेतकरी नेते
-----------
प्रतिक्रिया
कारखानदार आणि सरकारने उसाचा भाव न ठरवता शेतकऱ्यांची उघड लूट चालवली आहे. शेतकऱ्यांनी आता झोपेचे सोंग सोडून आपल्या हक्कासाठी एकवटले पाहिजे.
- भाऊसाहेब शेळके,
शेतकरी नेते
-------
प्रतिक्रिया
यंदा उसाची वाढ कमी असल्याने साखर उतारा घटण्याची शक्यता आहे. इतर कारखान्यांनी दर जाहीर करताच, त्यांच्या तुलनेत जयहिंद शुगर शेतकऱ्यांना योग्य दर देईल.
- कृष्णा डोणगावकर,
चेअरमन, जयहिंद शुगर, जामगाव