हळद पिकावर कंदमाशी, करपाचा प्रादुर्भाव
--------
योग्य व्यवस्थापनाचा तज्ज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ८ ः हळद पिकात सध्या कंदमाशीचा प्रादुर्भाव तसेच करपा, पानांवरील ठिपके, कंदकुज, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळत आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील डॉ. गजानन गडदे, डॉ. दिगंबर पटाईत व मधुकर मांडगे यांनी शेतकऱ्यांना योग्य व्यवस्थापनाचा सल्ला दिला आहे.
कंदमाशीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास शिफारशीनुसार क्विनॉलफॉस किंवा डायमेथोएटची फवारणी करावी. कंद उघडे पडू नयेत यासाठी मातीची भर द्यावी तसेच शेत स्वच्छ व तणमुक्त ठेवावे. करपा व पानांवरील रोगांसाठी प्रादुर्भावानुसार शिफारस केलेल्या बुरशीनाशकांची फवारणी करावी. कंदकुज टाळण्यासाठी शेतात पाणी साचू न देता निचरा करावा व ट्रायकोडर्माचा वापर करावा. पालाशाच्या कमतरतेत जुन्या पानांच्या कडा पिवळ्या होऊन तपकिरी पडतात. ही लक्षणे करप्यासारखी दिसू शकतात. त्यामुळे योग्य निदान करूनच उपाययोजना करावी. पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास शिफारशीनुसार सल्फेट ऑफ पोटॅश व ग्रेड- २ सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.
((चौकट)))
फवारणी करताना घ्या काळजी
फवारणी करताना औषधाचे लेबल व शिफारस केलेले प्रमाण तपासावे. कडक उन्हात फवारणी टाळून सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी. अनावश्यकपणे विविध औषधे एकत्र मिसळू नयेत. तसेच संरक्षक साधनांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विद्यापीठाच्यातीने करण्यात आले आहे.
------------