पाणीपुरवठा बंद करून
ग्रामसेवकाला धक्काबुक्की
--
उदगीर, ता. २४ (बातमीदार) : शासकीय विहिरीच्या पंपाचे वायर आणि स्टार्टरची तोडफोड करून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी तसेच गावाचा पाणीपुरवठा बंद पाडून ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही घटना धोंडीहिप्परगा (ता. उदगीर) येथे घडली.
ग्रामपंचायत अधिकारी भारत कमल कांबळे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, धोंडीहिप्परगा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावाच्या पश्चिम बाजूने वाहणाऱ्या नाल्याच्या डाव्या काठावर, सर्वे क्रमांक ३१२ च्या शेजारी शासकीय विहीर आहे. या विहिरीवर बसविण्यात आलेल्या पंपाचा वायर व स्टार्टरची तोडफोड करून गोपीनाथ दत्तात्रय बिरादार (रा. धोंडीहिप्परगा, ता. उदगीर) याने सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच विद्युत पंपाच्या पेटीला कुलूप लावून गावाचा पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोपही करण्यात आला. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी कांबळे यांनी संबंधिताकडे विचारणा केली असता शासकीय विहीर आपल्या मालकीची असून ती आपल्या जमिनीत येते, असा दावा आरोपीने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी २० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणीही आरोपीने केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, भारत कांबळे आणि पाणीपुरवठा कर्मचारी राजकुमार महाराज कमलापुरे हे विहिरीवरील कुलूप काढून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी गेले असता, आरोपीने ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच कुलूप काढल्यास पाय मोडण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला.