वैजापूर, ता. २० (बातमीदार) : ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्ज आणि जुन्या वैमनस्याच्या कारणावरून बोरसर कारखाना परिसरात रविवारी दोन गट आमनेसामने आल्याने जोरदार राडा झाला. या घटनेत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठी-काठ्या, लोखंडी रॉड, कुऱ्हाड तसेच धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचे आरोप केले आहेत. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास बोरसर कारखाना परिसरातील किराणा दुकानाजवळ तसेच घरासमोर या वादाला सुरुवात झाली. आकाश रामा पठारे यांच्या गटाच्या तक्रारीनुसार, सुनील प्रभाकर बोडखे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज त्यांच्या विरोधात भरल्याच्या कारणावरून वाद घातला. यावेळी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यानंतर आकाश पठारे व त्यांचे मित्र तक्रार देण्यासाठी जात असताना सुनील बोडखे व त्यांच्या साथीदारांनी त्यांना रस्त्यात अडविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी लोखंडी गजाने आकाश यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या गटाच्या तक्रारीनुसार, सुनील प्रभाकर बोडखे यांना दीपक ताराचंद डुक्रे, कृष्णा ताराचंद डुक्रे व त्यांच्या साथीदारांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून घेरले. आरोपींनी चाकू, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड व कुऱ्हाडीने सुनील यांच्या डोक्यात व पाठीवर वार करून जखमी केल्याचा आरोप आहे. मारहाणीच्या वेळी दीड तोळ्याची सोन्याची चेन ओढून नेल्याचे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे बोरसर कारखाना परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात संबंधित कलमांन्वये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.