राज्यात क्षयमुक्तीसाठी व्यापक मोहीम

राज्यात क्षयमुक्तीसाठी व्यापक मोहीम

Published on

राज्यात क्षयमुक्तीसाठी व्यापक मोहीम
‘टीबीमुक्त भारत अभियाना’ची आजपासून अंमलबजावणी

जागतिक क्षयरोग दिन २०२६

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : केंद्र सरकारतर्फे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त ‘टीबीमुक्त भारत अभियान - १०० दिवसांची तीव्र मोहीम’ २४ मार्चपासून देशभरात राबविण्यात येणार असून, महाराष्ट्रातही या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित निवडण्यात आलेल्या ११,०९१ जोखीमग्रस्त गावे व शहरी वॉर्डमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

पारंपरिक लक्षणांवर आधारित तपासणीऐवजी जोखीमग्रस्त लोकसंख्येची सक्रिय तपासणी करण्यावर भर देण्यात आला आहे. निःक्षय पोर्टलवरील एआय विश्लेषणाच्या आधारे सूक्ष्म नियोजन व रूट मॅपिंग करण्यात आले असून, वृद्ध, मधुमेही, कुपोषित, एचआयव्ही, क्षयरुग्णांचे संपर्क, स्थलांतरित व झोपडपट्टीतील नागरिकांची १०० टक्के तपासणी सुनिश्चित केली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हाताने वापरता येणारे क्ष-किरण यंत्राद्वारे जलद तपासणी करून संशयित रुग्णांना तत्काळ ‘नॅट’ (न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्ट) चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दुर्गम व आदिवासी भागांमध्ये निक्षय मोबाईल युनिटद्वारे सेवा पोहोचविण्यात येतील. या मोहिमेत आयुष्मान आरोग्य शिबिरांद्वारे क्षयरोगासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, ॲनिमिया व कुपोषण यांसारख्या आजारांची एकत्रित तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विविध विभागांचा समन्वय साधत रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. लोकप्रतिनिधी, स्वयंसहाय्यता गट, माय भारत स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात येणार असून, निःक्षय मित्र उपक्रमाद्वारे रुग्णांना पोषण व मानसिक आधार दिला जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

आरोग्य शिबिरांचे आयोजन
१०० दिवसांच्या कालावधीत प्रत्येक उच्च-जोखीम क्षेत्रात आयुष्मान आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. दिवसनिहाय व गावनिहाय सूक्ष्म नियोजन तयार करण्यात आले आहे. संपूर्ण मोहिमेचे रिअल-टाइम संनियंत्रण निःक्षय पोर्टलद्वारे करण्यात येणार असून, जिल्हा व राज्य स्तरावर नियमित आढावा घेतला जाणार आहे. या मोहिमेमुळे क्षयरुग्णांचा लवकर शोध, वेळेत उपचार, उपचारातील सातत्य आणि मृत्यूदरात घट साध्य होण्यास मदत होणार आहे. राज्यात क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने ही मोहीम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com