

शहापूर आयटीआयचे पद्मश्री सिंधुताई सपकाळ नामकरण
खर्डी (बातमीदार) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शहापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पद्मश्री सिंधुताई सपकाळ असे नामकरण करण्यात आले. आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ. मनोहर सासे, नगरसेवक विनोद कदम, संतोष निवलकर, प्राचार्य राम हिरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
...............
पतंगाचा मांजा अडकल्याने दुचाकीस्वार जखमी
भिवंडी (वार्ताहर) : शहरातील हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरून जात असताना पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. डोक्यावर हेल्मेट असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. महेंद्र रवींद्र पाटील (वय ३१) असे जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. भिवंडी-कल्याण मार्गावर औषध आणण्यासाठी मित्रासोबत निघालेल्या महेंद्रच्या तोंडावर मांजा अडकल्याने तो गंभीर जखमी झाला. हेल्मेट परिधान केल्यामुळे मोठा अनर्थ टळला; मात्र मांजामुळे चेहऱ्यावर व त्यानंतर हेल्मेटच्या गळ्याभोवती बांधणाऱ्या बेल्टला चीर पडली आहे. गेल्या वर्षी याच उड्डाणपुलावर अशाच प्रकारच्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता.
................
रायझिंग डेमध्ये विद्यार्थ्यांनी घेतले सुरक्षेचे धडे
किन्हवली (बातमीदार) : ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने सध्या रायझिंग डे सप्ताह सुरू आहे. यानिमित्त सोमवारी (ता. ६) किन्हवली पोलिस ठाण्यात रायझिंग डे साजरा करण्यात आला. दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलिस विभागाला ध्वज सुपूर्द केला होता. त्या दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस विभागाच्या वतीने रायझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. किन्हवली पोलिस ठाण्यात सोमवारी रायझिंग डे साजरा करण्यात आला. या वेळी किन्हवली येथील शहा चंदूलाल सरूपचंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खैरनार यांनी पोलिस रायझिंग डे व शस्त्रे, जनसुरक्षा व महिला सुरक्षा, बालकांच्या लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याविषयी माहिती, सायबर गुन्हे, पोलिसांचे दैनंदिन कामकाज व शस्त्रे याबाबत माहिती दिली, तसेच वाहतूक नियम, हेल्मेटचा फायदा आणि सक्ती, सीट बेल्टमुळे होणारे फायदे, ट्रिपल सीटचे तोटे, मोटार अपघात आदी विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी शहा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक शरद सुरळकर, रामेश्वर तळेकर व पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
.....................
टिटवाळ्यात मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
टिटवाळा (वार्ताहर) : कॅन्सरविरोधात जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘रन फॉर फाईट अगेन्स्ट कॅन्सर’ मॅरेथॉन उत्साहात पार पडली. रेड स्वस्तिक सोसायटी, स्पर्श फाउंडेशन, स्पंदन फाउंडेशन आणि आनंद होम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सामाजिक उपक्रमात टिटवाळा आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. टिटवाळ्यातील महागणपती मंदिर प्रांगणातून रविवारी (ता. ५) सकाळी सहा वाजता या मॅरेथॉनची सुरुवात झाली. स्पर्धेसाठी पाच किमी आणि तीन किमी असे दोन गट तयार केले होते. या मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा सक्रिय सहभाग दिसून आला. विशेषतः तरुण वर्गाचा उत्साह उल्लेखनीय होता. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते झेंडा दाखवत स्पर्धेस सुरुवात झाली. मॅरेथॉनच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोद नांदगावकर यांनी जनतेला संबोधित करीत कॅन्सरविरोधातील लढाईत प्रत्येक व्यक्तीचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, यावर भर दिला. कॅन्सर या आजाराबाबत जनजागृती व्हावी, तसेच जनतेने आपल्या आरोग्याबाबत सजग राहावे, या हेतूने या कार्यक्रमाचे जे आयोजन केले आहे, ते उल्लेखनीय आहे. असे म्हणत जिल्हाधिकारी शिनगारे यांनी आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान येथील महागणपतीचे दर्शन घेत पूजा-अभिषेकासह त्यांनी आरती केली. यावेळी गणपती मंदिर विश्वस्त सुभाष जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय यांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर कल्याणचे तहसीदार सचिन शेजल हेदेखील उपस्थित होते.
....................
किन्हवलीत पत्रकार दिन साजरा
किन्हवली (बातमीदार) : कुंजल प्रतिष्ठान व माय मराठी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शहापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी प्रा. गोपाळ वेखंडेलिखित ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’ या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. गोपाळ वेखंडे यांचे चिरंजीव दिवंगत कुंजलची जयंती व मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोमवारी (ता. ६) शहापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शिंदे व कृषितज्ज्ञ डॉ. प्रकाश भांगरथ यांच्या वतीने उपस्थितांना पेन व पॅड वाटण्यात आले. याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे, निवृत्त आदर्श शिक्षक विठ्ठल गगे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष हरड, कृषितज्ज्ञ डॉ. प्रकाश भांगरथ, साहित्यिक रवींद्र यशवंतराव, बाजार समिती संचालक विनायक सापळे, महेश पतंगराव, शिवसेना सचिव रवींद्र लकडे, उद्योजक भिवाजी वेखंडे, शिक्षक क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर घागस आदी मान्यवरांसह तालुक्यातील विविध क्षेत्रांतील शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.
.......................
ऑइलवरून घसरले पाच दुचाकीस्वार
ठाणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनांतून ऑइल सांडण्याची मालिका सुरू आहे. सोमवारी (ता. ६) सकाळी नौपाडा, गोखले रोडवरील बी केबिन येथील वळणावरील रस्त्यावर वाहनांतून सांडलेल्या ऑइलवरून पाच दुचाकीस्वार घसरून पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी आणि ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली. नौपाडा, गोखले रोडवर सकाळी अनोळखी वाहनातून ऑइल सांडले होते. सकाळी कामाला जाण्याच्या किंवा पेपर तसेच दूध टाकण्यासाठी घाईगडबडीत निघालेले दुचाकीस्वार त्या ऑइलवरून घसरू लागले. त्यामुळे काही नागरिकांनी हा प्रकार पाहून त्या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना सावधगिरीने जाण्यास सांगितले. याचदरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नौपाडा पोलिसांसह महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत ऑइलवर माती पसरवली, तसेच तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.
....................
सायबर क्राइमबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पडघा (बातमीदार) : तालुक्यातील पडघा येथील टी. ए. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पोलिसांनी सायबर क्राइमबाबत मार्गदर्शन केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, तसेच पोलिस रायझिंग डेनिमित्त नुकतेच टी. ए. पाटील शाळेत सायबर क्राइम यावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून पडघा पोलिस ठाण्याचे ए.पी.आय. अन्वर शेख उपस्थित होते. यावेळी त्यांनी सायबर क्राइमद्वारे नागरिकांची कशी फसवणूक होते, तसेच ते समाजाला कसे घातक आहे. यावर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित पोलिस बॅण्ड पथकाचाही शाळेच्या वतीने सन्मान केला. या कार्यक्रमासाठी जीवनविद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शशांक तांबोळी, खजिनदार यशवंत गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र थोरात उपस्थित होते.
...................
मुरबाड तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
मुरबाड (बातमीदार) ः मुरबाड मतदारसंघातील माजी आमदार दिगंबर विशे यांच्या जन्मदिनानिमित्त ११ फेब्रुवारीला सर्वोदय विद्यालय, कुडवली येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. जैवविविधता ः एक पर्यावरणीय संस्था, चला सेंद्रिय शेतीतून विषमुक्त अन्न बनवूया, सहकार : कोकणाला शाप की वरदान या तीनपैकी एका विषयावर भाषण करायचे आहे. या स्पर्धेत मुरबाड तालुक्यातील आठवी ते दहावी या गटातील एका विद्यालयाचा एकच विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या शिफारशीने सहभाग घेऊ शकतो, अशी माहिती आयोजक शरद पाटील यांनी दिली. सादरीकरण पाच मिनिटांच्या निर्धारित वेळेत स्पर्धक करू शकतात. यावेळी तज्ज्ञांचं मार्गदर्शन, उपस्थितांसाठी लकी ड्रॉ, चहा-नाश्ता व जेवणाची व्यवस्था असेल. भाग घेण्यासाठी प्रवेश नि:शुल्क आहे. इच्छुक स्पर्धकांनी १ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजक एस. एल. पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.