बंधाऱ्याचा सुकाळ ; पाण्याचा दुष्काळ

बंधाऱ्याचा सुकाळ ; पाण्याचा दुष्काळ
Published on

बंधाऱ्याचा सुकाळ; पाण्याचा दुष्काळ
१५ वर्षांत अनेक बंधारे, पाण्याच्या पातळीत वाढ, संशोधनाचा विषय
वाडा, ता. ५ (बातमीदार) : वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून गेल्या १५ वर्षांत अनेक बंधारे बांधले असून, या बंधाऱ्यामुळे पाण्याचा पातळीत किती वाढ झाली हा संशोधनाचा विषय आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे मार्च महिन्यातच या बंधाऱ्यात पाणीच राहत नाही. त्यामुळे येथील नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत असतो. त्यामुळे बंधाऱ्यांचा सुकाळ, मात्र पाण्याचा दुष्काळ असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
वाडा तालुक्याला निसर्गाने दिलेल्या पाचही नद्यांना बारामाही मुबलक पाणी साठा आहे. या नद्यांवर गेल्या १५ वर्षांत अनेक बंधारे बांधले आहेत. मात्र, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, बंधाऱ्यासाठी योग्य जागा न निवडणे व टक्केवारीमुळे बंधारे कोरडे पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्याला पंचनद्यांचे वरदान लाभले आहे. तानसा, वैतरणा, पिंजाळ, गारगावी, देहर्जा या बारामाही वाहणाऱ्या नद्या आहेत. मात्र, नियोजनाचा अभाव असल्याने मार्च महिन्यात या नद्या कोरड्या पडतात. गेल्या १५ वर्षांत अनेक बंधारे बांधले आहेत. त्यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, मार्च महिन्यात पाण्याची पातळी खोल जात असल्याने बंधाऱ्यांचा खरोखरच उपयोग झाला आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
वाडा तालुक्यामध्ये १५ वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने काही कोटी रुपये खर्च करून मेट, कोंढला, अलमान, पीक, गुहीर व सांगे येथे कोकण टाईप पद्धतीचे बंधारे बांधले. या सर्वच बंधाऱ्यांचे निकृष्ट काम झाल्याने पाणीगळती होत असल्यामुळे सर्वच बंधाऱ्यांमध्ये मार्चअखेरपर्यंत पाणी शिल्लक राहत नाही. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठीही दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात, पण तरीही पाणीगळती होणे थांबत नसल्याचे चित्र आहे.

वैतरणा नदीवरील कोनसई, गातेस येथे कोकण टाईप बंधारा गेल्या काही वर्षांपूर्वी बांधला आहे. या बंधाऱ्याचे बांधकाम अत्यंत दर्जेदार झाले असल्याने बंधाऱ्यात जून अखेरपर्यंत मुबलक पाणी असते. त्यामुळे येथील शेतकरी दुबार-तिबार पिके काढताना दिसत आहेत, तर या परिसरात पाणीटंचाई जाणवत नसल्याचे येथील ग्रामस्थ अनंता पाटील यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी यांना बंधारा दाखवायचा असल्यास हेच बंधारे दाखविले जातात, असे येथील नागरिक सांगतात.
---------------
गेल्या काही वर्षांत या पाचही नद्यांवर अनेक बंधारे बांधण्यात आले असून, यातील काही बंधाऱ्यांची कामे निकृष्ट झाली आहेत, तर काही बंधाऱ्यांच्या जागा चुकीच्या निवडल्याने मे अखेरपर्यंत बंधाऱ्यात पाणी राहत नाही. त्यामुळे करोडो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पिके घेण्यास अडचण येत आहे.
- प्रफुल पाटील, अध्यक्ष, काँग्रेस पालघर जिल्हा, तथा शेतकरी नेते
------------
वैतरणा नदीतील पाणी अडवून ते मराठवाड्यात नेण्याचा घाट सरकारने घातला आहे. मात्र, येथील शेतकरी व नागरिकांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. प्रत्येक नदीवर पाच किलोमीटर अंतरावर बंधारे बांधल्यास वाडा तालुका ‘सुजलाम सुफलाम’ होईल, पण सरकार याकडे लक्षच देत नाही.
- गोविंद पाटील, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकगे गट

--------
तानसा नदीवरील मेट येथील कोरडे पात्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com