रेल्वे नियोजनाचा विस्कटलेला समतोल

रेल्वे नियोजनाचा विस्कटलेला समतोल
Published on

बदलापूर रेल्वे नियोजनात मागेच!
मोहिनी जाधव; सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. ७ : मध्य रेल्वेवरील बदलापूर आणि अंबरनाथ ही दोन शहरे झपाट्याने विस्तारत असताना रेल्वे सुविधांच्या बाबतीत मात्र बदलापूरवर मोठा अन्याय होत असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रवासीसंख्येची आकडेवारी पाहिली तर बदलापूरकरांना मिळणारी वागणूक अत्यंत दुजाभावाची असल्याचे स्पष्ट होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बदलापूर स्थानकातून दररोज सुमारे दोन लाख प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात, तर अंबरनाथमध्ये ही संख्या केवळ ७८ हजार आहे. म्हणजेच बदलापूरची प्रवासीसंख्या अंबरनाथपेक्षा अडीच पट जास्त आहे. असे असूनही, रेल्वे फेऱ्यांचे गणित मात्र व्यस्त आहे. मुंबईकडे जाणाऱ्या एकूण फेऱ्यांपैकी अंबरनाथसाठी ११२ लोकल उपलब्ध आहेत, तर बदलापूरसाठी ही संख्या अत्यंत कमी आहे. बदलापूरहून सुटणाऱ्या लोकल केवळ ३९ आहेत, तर अंबरनाथहून ३८ लोकल सुटतात. प्रवासीसंख्या कमी असूनही अंबरनाथला झुकते माप मिळत असल्याची भावना बदलापूरकरांमध्ये आहे.

सुविधांची कमतरता
बदलापूर स्थानकातील प्लॅटफॉर्म, जिने आणि सरकते जिने (एस्केलेटर) यावर सध्या क्षमतेपेक्षा जास्त ताण येत आहे. पहाटे ४ पासून सुरू होणारी गर्दी सकाळी ११ पर्यंत कायम असते. अपुऱ्या सोयींमुळे चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सायंकाळी कामावरून परततानाही हीच जीवघेणी कसरत करावी लागते.

महिला प्रवाशांचे हाल
एकूण प्रवाशांपैकी ३० ते ४० टक्के महिला आहेत. मात्र, १२ डब्यांच्या लोकलमध्ये महिलांसाठी असलेले मर्यादित डबे अपुरे पडत आहेत. महिला विशेष लोकल, वाढीव डबे, स्तनपान कक्ष आणि सुरक्षित आसन व्यवस्थेची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

अद्ययावतीकरणाचा वेग संथ
२०१९ पासून मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमार्फत स्थानकाच्या अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. १५० मीटरचा डेक आणि नवीन जिन्यांचे काम संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे अंबरनाथमध्ये अतिरिक्त प्लॅटफॉर्मची योजना प्रस्तावित असताना बदलापूरमध्ये मात्र मूलभूत गरजांसाठीही संघर्ष करावा लागत आहे.

प्रवाशांचा वाढता असंतोष
वाढीव फेऱ्यांसाठी बदलापूरकरांनी अनेकदा आंदोलने आणि सह्यांच्या मोहिमा राबवल्या आहेत. २०२४ मधील रेल रोको आंदोलनानंतर काही प्रवाशांवर गुन्हे दाखल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तरीही असंतोष धुमसतच आहे.

महसूल जास्त, सुविधा कमी?
बदलापूर शहरातून रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. तरीही नियोजित चिखलोली स्थानकाचे काम रखडल्याने आणि फेऱ्या न वाढल्याने बदलापूरकरांची व्यथा कायम आहे. ‘‘आमचा महसूल घेता, मग सुविधा देण्यात आखडता हात का,’’ असा सवाल आता बदलापूरचे नागरिक विचारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com