मानकोली ब्रिजवर जीवघेणी स्टंटबाजी

मानकोली ब्रिजवर जीवघेणी स्टंटबाजी
Published on

मानकोली पुलावरील स्टंटबाजीप्रकरणी तिघे गजाआड

डोंबिवली, ता. ९ ः समाजमाध्यमावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणाई कोणत्या थराला जाऊ शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मोठागाव-मानकोली पुलावर दुचाकी चालवणाऱ्याचे डोळे झाकून, ‘ट्रिपल सीट’ बसून धोकादायक स्टंट करणाऱ्या तिघा तरुणांना विष्णूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून केलेल्या या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये गणेश रेड्डी (२२), कबीर नेतकर (२२) आणि यश मालवणकर (२३) या तरुणांचा समावेश आहे. या तिघांनी दुचाकीवरून मानकोली पुलावर ही जीवघेणी स्टंटबाजी केली होती. दुचाकी चालवणाऱ्या चालकाचे डोळे हाताने झाकले होते आणि दुचाकीवर तिघे जण स्वार होते. अशा स्थितीत पुलावरून सुसाट वेगाने दुचाकी चालवत त्यांनी स्टंट केले.

रील्सचा नाद अंगलट
स्टंटचा व्हिडिओ बनवून तो इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध करण्यात आला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि विष्णूनगर पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी तिघांविरोधात मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये (कलम १८४, १२८, १२९) गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे.

पोलिसांची करडी नजर
सोशल मीडियावरील लाइक्स आणि फॉलोअर्ससाठी तरुण आपला जीव धोक्यात घालत आहेत. अशा प्रकारची स्टंटबाजी केवळ धोकादायकच नाही तर बेकायदा आहे. यापुढे अशा कृत्यांवर सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांची करडी नजर असेल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com