

ट्रॅव्हल्स एजंटांची चलती
पर्यटनस्थळांच्या चौकशीसाठी नागरिकांची रीघ
वाशी, ता. १३ (बातमीदार) ः शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागण्यास सुरुवात झाली असून, दहावी-बारावीच्या परीक्षादेखील नुकत्याच संपल्या आहेत. त्यामुळे कुटुंबासह फिरायला जाण्याचे नियोजन नागरिकांकडून केले जात असून, ट्रॅव्हल्स एजंटांकडे पर्यटनस्थळांच्या चौकशीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर रीघ लागलेली दिसत आहे.
सध्या राज्यात कडक उन्हाळा जाणवत असल्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळावा यासाठी नागरिकांचा थंड हवेच्या ठिकाणांकडे अधिक कल वाढला आहे. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व माथेरान या ठिकाणांची सर्वाधिक मागणी असून, ही ठिकाणे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणारी असल्याने अनेक कुटुंबे या ठिकाणांना प्राधान्य देत आहेत. त्याचबरोबर कोकणातील मालवणसारख्या समुद्रकिनारी भागांनाही मोठी पसंती मिळत आहे. समुद्रकिनाऱ्यावर कुटुंबासह सुट्टीचा आनंद लुटता येतो, तसेच मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा मिळते, यामुळे अशा ठिकाणांकडेही नागरिक आकर्षित होत आहेत. अनेक कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिकही सोबत असल्याने पर्यटनासोबतच देवदर्शन करण्याचीही इच्छा व्यक्त होत आहे. त्यामुळे अष्टविनायक, पंढरपूर, कोल्हापूरची महालक्ष्मी यांसारख्या धार्मिक स्थळांच्या पॅकेजेसबाबतही मोठ्या प्रमाणात चौकशी केली जात आहे. याशिवाय, कमी कालावधीत म्हणजे एक ते तीन दिवसांत पूर्ण करता येणाऱ्या ‘मुंबई दर्शन’ सहलींनाही मागणी वाढली आहे. काही नागरिक महाराष्ट्राबाहेरील पण जवळच्या ठिकाणांचा पर्याय निवडत असून, गोवा, दमण-दीव यांसारख्या केंद्रशासित प्रदेशांनाही पसंती देत आहेत.
पर्यटन आणि धार्मिक स्थळांचा समावेश
ट्रॅव्हल्स व्यावसायिकांच्या मते, यंदा नागरिकांचे नियोजन बजेटकेंद्रित असून, कमी दिवसांत अधिक अनुभव घेण्याकडे कल आहे. त्यामुळे दोन ते चार दिवसांच्या पॅकेजेसना विशेष मागणी आहे. तसेच कुटुंबातील सर्व वयोगटांना लक्षात घेऊन पर्यटन आणि धार्मिक स्थळांचा समावेश असलेले पॅकेजेस अधिक लोकप्रिय ठरत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल्स व्यवसायाला चांगली चालना मिळत असून, नागरिकांकडून पर्यटन नियोजनाला वेग आला आहे.
उन्हाळा सुरू झाला असून, कुटुंबासोबत तीन-चार दिवसांत परत येता येईल, अशा सहलीचा विचार करत आहे. त्यामुळे महाबळेश्वरला जाण्याचे नियोजन केले आहे.
- उमेश दिवटे, नागरिक
मुंबईत वाढत्या उष्णतेमुळे थंड व समुद्रकिनारी ठिकाण निवडण्याचा विचार आहे. कोकणात फिरायला जाऊन मुलांनाही आनंद मिळेल आणि ज्येष्ठांना देवदर्शनही करता येईल.
- अनुप आचरेकर, नागरिक
शाळांना सुट्ट्या लागल्याने सहलींबाबत चौकशी वाढली आहे. बहुतांश नागरिक कमी खर्चात आणि कमी दिवसांत सहल पूर्ण करण्यावर भर देत आहेत. पर्यटनासोबत देवदर्शन असलेल्या पॅकेजेसनाही मोठी मागणी आहे.
- संजय नेहरकर, चैतन्य टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.